

लासलगाव (नाशिक) : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातील १३ छात्रांची विविध संरक्षण दलात निवड झाली. प्रशिक्षण पूर्ण करत सुट्टीवर आलेल्या या छात्रांचा सत्कार सोहळा नुकताच महाविद्यालयात पार पडला. निवड झालेल्या छात्रांत ७ जण भारतीय सैन्यदलात, ५ महाराष्ट्र पोलिस दलात, १ मर्चंट नेव्हीत रुजू झाले आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे उपस्थित होते. त्यांनी शुभेच्छा देताना देशसेवेचे हे कार्य पूर्ण सामर्थ्याने पेलण्याचे आवाहन केले. या सन्मान सोहळ्यासाठी उपप्राचार्य डॉ. सोमनाथ आरोटे, प्रा. भूषण हिरे, डॉ. संजय निकम, प्रा. उज्ज्वल शेलार उपस्थित होते. प्रास्तविकात लेफ्टनंट बापू शेळके यांनी छात्रांचा परिचय करून देत एनसीसी विभागाच्या कार्याचा आढावा मांडला. सर्व यशस्वी छात्रांना महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिकचे कमान अधिकारी ले. कर्नल एम. एस. केरुला, प्रशासकीय अधिकारी ले. कर्नल कनिष्क गौर, विद्यार्थी, प्राध्यापकांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन रामेश्वरी आहेर व समृद्धी घायाळ यांनी केले.
या छात्रांचा झाला सन्मान
दमयंती वाकचौरे, मानसी जाधव, शुभांगी चव्हाण, पायल गायकर, साक्षी कवडे यांची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली. संयोग वाळके, सिद्धेश जाधव, नीलेश जाधव, ओम कोकणे, प्रशांत काळे, सूरज गरड, गणेश गुंजाळ यांची भारतीय सैन्य दलात तर आदित्य दीक्षितची मर्चंट नेव्हीत निवड झाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला.