

नाशिक : आज नरक चतुर्दशी.. 'तमसो मा ज्योतिर्गमय' अर्थात अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दीपोत्सवाचा मुख्य दिवस. आज सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. अभ्यंगस्नानाने सुरू झालेला हा मंगलमय दिवस, घराघरांत लावलेल्या पणत्यांच्या रोषणाईने आणि फटाक्यांच्या आतषबाजीने अक्षरशः उजळून निघाला आहे. फराळाचा घमघमाट, नवीन वस्त्रांची खरेदी, कौटुंबिक स्नेहाचा ओलावा आणि आप्तेष्टांच्या भेटीगाठींनी दीपोत्सवाचे तेजोपर्व सुरू झाले आहे.
अंधारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय अशा दिवाळीचा मुख्य दिवस नरक चतुर्दशी आज आहे. दिव्यांची आरास आणि आकाशकंदिलांच्या झगमगाटाचा हा दीपोत्सव पुढील चार दिवस साजरा केला जाणार आहे, अभ्यंगस्नानाने दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे.
पहाटेपासूनच घराघरांत दिवाळीची लगबग सुरू झाली होती. सुगंधी उटणे लावून केलेले अभ्यंगस्नान, नवीन कपडे परिधान करून देवतांचे दर्शन आणि घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद या पारंपरिक प्रथांचे पालन मोठ्या श्रद्धेने करण्यात आले. दारापुढे काढलेल्या सुबक रांगोळ्या आणि आकाशी उजळलेले आकाशकंदील या सणाच्या आगमनाची साक्ष देत होते.
दिवसभर महिलावर्गाची फराळाचे पदार्थ बनवण्यासाठी आणि एकमेकांना फराळाचे ताट देण्यासाठी लगबग सुरू होती. लाडू, शंकरपाळी, चिवडा, करंजा अशा विविध पदार्थांनी घराघरांत गोडवा आणला आहे. बदलत्या काळानुसार, अनेकांनी तयार फराळाला पसंती दिली असली तरी सणाचा उत्साह मात्र तोच होता.
बाजारपेठांमध्ये चैतन्याचे उधाण
गेले काही दिवस खरेदीसाठी फुलून गेलेल्या बाजारपेठांमध्ये आजही प्रचंड गर्दी दिसून आली. लक्ष्मीपूजनाच्या साहित्यापासून ते पणत्या, रांगोळी, कपडे आणि मिठाई खरेदीसाठी नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी केली. या उत्साहामुळे व्यापारीवर्गातही समाधानाचे वातावरण असून, ही दिवाळी अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणारी ठरत आहे.
स्नेह आणि सौहार्दाचा प्रकाश
दिवाळी हा केवळ दिव्यांचा किंवा फटाक्यांचा सण नाही, तर तो नाती जपण्याचा आणि स्नेह वाढवण्याचा उत्सव आहे. या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा, मिठाईचे आदान-प्रदान यातून नात्यांमधील बंध अधिक घट्ट होतात. हा सण केवळ बाह्य अंधार दूर करणारा नसून, मनामनांतील द्वेष आणि नकारात्मकता दूर करून स्नेह आणि सौहार्दाचा प्रकाश पसरवणारा आहे. नव्या आशा आणि नव्या संकल्पांसह हा दीपोत्सव सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो, हा संदेश घेऊन आलेल्या दिवाळीचे जल्लोषात स्वागत होत आहे.