

नगरसुल (नाशिक) : कळवण तालुक्यातील चणकापूर धरणाच्या जवळ असलेल्या मोहमुख गावात आजही अंत्यविधीसाठी स्मशानभूमी आणि शेडही नाही. स्वातंत्र्याला 77 वर्षे पूर्ण होऊनही गावकऱ्यांना अंत्यविधीसाठी नदीपात्राचा आधार घ्यावा लागतोय, शासनाचे गावातील मूलभूत सुविधांकडे कायमच दुर्लक्ष होत आहे.
गावातील एका महिलेचे पावसातच नदीपात्रात पत्र्याचा आधार देऊन अंत्यविधी करण्यात आला. पावसाळ्यात पूर आल्यास अशा प्रेतांची विटंबना होत असल्याने गावकऱ्यांत संताप होत आहे.
कळवण तालुक्याचा स्वातंत्र्यसंग्रामातील गौरवशाली इतिहास असूनही आजवर कोणत्याही आमदार, तहसीलदार, प्रांताधिकारी किंवा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या गावासाठी पावले उचलली नाहीत. गावकऱ्यांनी शासन व लोकप्रतिनिधींना तातडीने स्मशानभूमी व शेड उभारण्याची मागणी केली आहे. विशेषतः जास्त पाऊस पडणाऱ्या आदिवासी भागातील वाड्या-तांड्यांसाठी अशी सुविधा उभारणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.