

सिडको (नाशिक) : विल्होळी पाझर तलावात बुधवारी (दि.25) सायंकाळी मासे पकडताना पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह गुरुवारी (दि.26) दुपारी स्कुबा डायव्हर गोविंद तुपे आणि अन्य युवकांनी शोधून काढत बाहेर काढला. दरम्यान, मृतदेह सापडत नसल्याने त्याच्या नातेवाइकांनी बुधवारी (दि.25) मध्यरात्री महामार्गावर आंदोलनाचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर नातेवाइकांनी आंदोलन स्थगित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण दशरथ जाधव (वय ३२) हा तरुण बुधवारी (दि.25) दुपारी तीनच्या सुमारास दोघा मित्रांसमवेत मासे पकडायला गेला होता. मासेमारी करताना तो पाण्यात बुडाला. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले, तालुका पोलिस निरीक्षक मृदुला नाईक, पोलिसपाटील संजय चव्हाण, हवालदार वाजे, शीतल गायकवाड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन टीमने तलावात त्याचा शोध सुरू केला. रात्री पाऊस व परिसरातील अंधार यामुळे शोधकार्यात अडथळा आला. मृतदेह मिळत नसल्याने संतप्त नातेवाइकांनी मध्यरात्री नाशिक-मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. परंतु पोलिसांनी समजूत काढल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. गुरुवारी (दि.26) स्कुबा डायव्हर गोविंद तुपे व गणेशगाव येथील युवकांना दुपारी १२ ला मृतदेह सापडला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोविंद तुपे हा स्कुबा डायव्हर आहे. त्याच्याकडे सर्व किट आहे. नाशिक तालुक्यात कुठेही अशी घटना घडल्यास त्याची मदत घेतली जाते. तुपे हा अहिल्यानगरजवळ दिंडीत सहभागी झालेला होता. बुधवारी (दि.25) रात्री निरोप मिळताच तो त्वरित निघुन सकाळी विल्होळीत पोहोचला आणि त्याने दुपारी मृतदेह शोधून काढला.