

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अंबड परिसरातील दत्तनगर येथे दूषित पाणीपुरवठ्यामुळे निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न महापालिका प्रशासनाच्या तातडीच्या उपाययोजनांनंतर मार्गी लागला आहे. परिसरात एक हजार ७०० मीटर लांबीची नवीन जलवाहिनी टाकून, १३० नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दत्तनगरमधील नागरिकांना आता महापालिकेच्या जलवाहिनीद्वारे शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
खबदारीचा उपाय म्हणून परिसरातील ५० बोरवेल सील करण्यात आल्या असून, आठवडाभरापासून टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठाही बंद करण्यात आला आहे.
मागील महिन्यात अंबडमधील दत्तनगर परिसरात दूषित पाणीपुरवठ्याची गंभीर प्रकार समोर आला होता. रासायनिक कंपन्यांचे दूषित पाणी बोरवेलमध्ये मिसळत असल्याने त्याचे पिवळसर आणि रासायनिक घटकयुक्त पाणी येत होते.
स्थानिक नागरिक हे पाणी पिण्यासाठी वापरत असल्यामुळे अनेकांना त्वचेचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या प्रकाराची गंभीर दखल घेत पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर-आडके आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दत्तनगर परिसराची पाहणी केली होती. नागरिकांना तातडीने शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच बोरवेलचा वापर थांबवून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
दि. २७ ऑक्टोबरपासून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यासह नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून दिलेल्या पाण्याच्या टाक्याही काढून घेण्यात आल्या आहेत. महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने खबदारीचा उपाय म्हणून ५० बोरवेल सील केल्या आहेत.
१०० टक्के नागरिकांना महापालिकेच्या जलवाहिनीतून पाणी उपलब्ध झाल्यामुळे दूषित पाण्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक समस्यांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पिण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून अत्यावश्यक बाबीच्या स्वरूपात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. अवघ्या आठवडाभरात एक हजार ७०० मीटर लांबीची जलवाहिनी टाकून परिसरातील १३० घरे आणि सोसायट्याना नळजोडण्या देण्यात आल्या.
पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार दत्तनगर परिसरात तातडीने नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. या जलवाहिनीतून १३० नळजोडण्या देण्यात आल्यामुळे परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठाही बंद करण्यात आला असून, नागरिकांना आता शुद्ध व पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
— रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग