

नाशिक (पुढारी विशेष) - निखिल रोकेडे:
तरुणांमध्ये डेटिंग ॲपची लोकप्रियता अधिक असली तरी सध्या सर्व वयोगटातील नागरिक अशा ॲप्सचा वापर करत आहेत. मात्र, मैत्री आणि जोडीदार शोधण्याच्या उद्देशाने वापरल्या जाणाऱ्या या ॲप्सच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस झपाट्याने वाढले आहेत.
एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात दर सात व्यक्तींपैकी एक व्यक्ती डेटिंग ॲपच्या माध्यमातून पैसे गमावत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे उच्चशिक्षित तरुण, व्यावसायिक, उद्योजक तसेच ज्येष्ठ नागरिकही सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचे निदर्शनास आले आहे.
फेसबुक, इन्स्टाग्रामसह विविध सोशल माध्यमांवर डेटिंग ॲप्सच्या आकर्षक जाहिराती केल्या जातात.
सुंदर छायाचित्रे, आकर्षक प्रोफाइल आणि मैत्रीचे आमिष दाखवून नागरिकांना या ॲप्सकडे आकर्षित केले जाते. सुरुवातीला साध्या गप्पा आणि मैत्रीने सुरू झालेला संवाद पुढे प्रेमसंबंध, भेटण्याचे आमिष किंवा आर्थिक व्यवहारांपर्यंत पोहोचतो. विश्वास संपादन केल्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी पैसे उकळले जातात. काही प्रकरणांत खाजगी छायाचित्रे आणि व्हिडिओंचा गैरवापर करून डेटिंग ॲपद्वारे ब्लॅकमेलिंगही केले जाते.
फेक प्रोफाइलद्वारे फसवणूक: सुंदर तरुणी किंवा तरुणांचे छायाचित्र वापरून बनावट खाते तयार केले जाते. व्हिडिओद्वारे मैत्री वाढवून विश्वास संपादन केल्यानंतर पैशांची मागणी केली जाते.
रोमान्स स्कॅम: प्रेमसंबंध किंवा लग्नाचे आमिष दाखवून महागड्या भेटवस्तू, वैद्यकीय उपचार, प्रवास किंवा कौटुंबिक अडचणींच्या नावाखाली पैसे उकळले जातात.
गुंतवणुकीचे आमिष: डेटिंग ॲपवर ओळख झाल्यानंतर शेअर बाजार, परकीय चलन किंवा क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगितले जाते. सुरुवातीला बनावट नफा दाखवून मोठी रक्कम गुंतवणुकीस भाग पाडले जाते.
हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंग: खाजगी छायाचित्रे, व्हिडिओ कॉल किंवा वैयक्तिक संवादाच्या माध्यमातून माहिती मिळवली जाते. त्यानंतर ती सार्वजनिक करण्याची धमकी देऊन पैसे मागितले जातात.
कफे बिल आणि प्रत्यक्ष भेटीतील फसवणूक: डेटिंग ॲपवरून भेटण्यास बोलावून विशिष्ट हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये नेले जाते. तेथे अवाजवी बिल आकारून पैसे भरण्यास भाग पाडले जाते.
बनावट ॲप आणि लिंक: प्रसिद्ध डेटिंग ॲप्ससारखे दिसणारे बनावट ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. त्यातून मोबाइलमधील माहिती, बँक तपशील आणि ओटीपी चोरायचा प्रयत्न होतो.
पुण्यात २०२६ मध्ये डेटिंग ॲपवरील ओळखीतून एका ५३ वर्षीय उद्योजकाची तब्बल ७ कोटी ७ हजार ६१ रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले. गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून ही रक्कम उकळण्यात आली.
राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवरील २०२५ च्या आकडेवारीनुसार, बनावट व्यक्तिमत्त्व किंवा प्रोफाइलच्या माध्यमातून फसवणुकीच्या तब्बल ४६ हजार ७८४ घटना नोंदवण्यात आल्या.
अधिकृत गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरमधूनच ॲप डाउनलोड करावे.
अनोळखी व्यक्तीला पैसे, बँक खाते क्रमांक, ओटीपी किंवा यूपीआय पिन कधीही देऊ नये.
केवळ ऑनलाइन ओळख असलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून कुठेही गुंतवणूक करू नये.
खाजगी छायाचित्रे, व्हिडिओ किंवा वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करणे टाळावे.
पहिली भेट नेहमी सार्वजनिक आणि सुरक्षित ठिकाणी घ्यावी.
संशयास्पद लिंक, क्यूआर कोड आणि अनोळखी ॲपपासून दूर राहावे.
तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला: "डेटिंग ॲपवर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना काळजी बाळगा. आकर्षक फोटो, प्रेमाचे आमिष किंवा गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देण्याच्या आश्वासनांना बळी पडू नका. आपली वैयक्तिक माहिती, खासगी फोटो, ओटीपी किंवा बँक खात्याचे तपशील कोणाशीही शेअर करू नका. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा."
— संदीप मिटके, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा नाशिक शहर.
सायबर फसवणुकीचे हे प्रकार किती गंभीर झाले आहेत, याची कल्पना विविध सर्वेक्षणांतून येते. 'मॅकेफी'च्या फेब्रुवारी २०२६ मधील भारतातील सर्वेक्षणामानुसार, सातपैकी एक व्यक्तीने ऑनलाइन डेटिंग किंवा रोमान्स स्कॅममध्ये पैसे घालवल्याचे सांगितले.
फसवणूक झालेल्यांचे सरासरी आर्थिक नुकसान २ लाख ८० हजार ६५० रुपये असल्याचे या सर्वेक्षणात नमूद केले आहे.
तसेच ७५ टक्के भारतीयांनी बनावट किंवा प्रोफाइलच्या मदतीने तयार केलेले प्रोफाइल अथवा छायाचित्रे पाहिल्याचे स्पष्ट केले आहे.