

नाशिक : दारणा नदीपात्रामध्ये निकामी अवस्थेतील बॉम्ब सापडल्याने शुक्रवारी (दि.३) एकच खळबळ उडाली . बॉम्ब शोध पथकाच्या माध्यमातून त्याची तपासणी केली असता सदर बॉम्ब निकामी असल्याचे समोर आले. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये हा बॉम्ब वाहून आला असून तो दुसऱ्या महायुद्धातील असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
चेहेडी गावाजवळ असलेल्या दारणा नदीपात्रात हा निकामी बॉम्ब सापडला. स्थानिक नागरिकांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी नाशिकरोड पोलिसांना संपर्क करून माहिती दिली. सापडलेला बॉम्ब हा एका बाजूस फुटलेल्या स्थितीत असल्याने तो निकामी झालेला आहे. शहर पोलिस दलाच्या बॉम्ब शोधक पथकाकडून त्याची तपासणी झाल्यावरच वस्तुस्थिती समोर येणार आहे.
दरम्यान, घटनेची माहिती कळताच सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर बॉम्बची रचना बघता तो दुसऱ्या महायुद्धातील असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली. दरम्यान, नाशिक शहर परिसराच्या अवतीभवती संरक्षण खात्याची मोठी हद्द आहे. दारणा आणि तिची उपनदी वालदेवी या दोन्हीही नद्या नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प या लष्कराचे प्रशिक्षण केंद्र असलेल्या तोफखाना केंद्राच्या परिसरातून वाहतात. त्यामुळे हा बॉम्ब नेमका नदीपात्रात कसा पोहोचला, याचा शोध नाशिकरोड पोलिसांकडून सुरू आहे.
---------------------