नाशिक : संस्कारक्षम पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेवर आहे. या पिढीला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द आहे. यासाठी शिक्षण व्यवस्थेत लवकरच सकारात्मक बदल दिसेल. आता शिक्षणमंत्री कॅबिनमध्ये नव्हे तर, फिल्डवर दिसतील, असा आशावाद राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.
शिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच नाशिक शहरात आलेल्या मंत्री भुसे यांचा शिवसेनेतर्फे गंगापूररोडवरील चिंतामणी लॉन्स येथे सत्कार करण्यात आला. तब्बल 100 किलो वह्या-पुस्तके देऊन शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी भुसे यांचा अनोख्या पध्दतीने सत्कार केला. यावेळी सत्काराला उत्तर देताना भुसे बोलत होते. शालेय जीवनातूनच नव्या पिढीवर संस्कार होत असतात. आदर्शवत पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडविणे आवश्यक आहेत. त्यासाठी शिक्षकही तेवढा तोलामोलाचा असावा लागतो. त्यासाठी शिक्षकांनाही अद्ययावत प्रशिक्षण दिले जाईल, असे भुसे म्हणाले. पक्ष वाढविण्यासाठी चांगल्या लोकांना प्रवेश दिला जाईल. जुने कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावर अन्याय होणार नाही. याची काळजी घेतली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची ताकद दिसेल. यासाठी शिवसैनिकांना सरकारी योजना तळागाळात पोहचवण्यासह, परिसरातील शाळा शैक्षणिक दृष्ट्या दर्जेदार राखण्यासाठी शिवसैनिकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे, सह संपर्क प्रमुख काशिनाथ मेंगाळ, धनराज महाले, पांडुरंग गांगड, सुनील पाटील, ग्रामीण जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, शिवाजी पालकर, लोकसभा संघटक योगेश म्हस्के, जिल्हा संघटक योगेश चव्हाणके, उप जिल्हाप्रमुख भाऊसाहेब निकम, शिवाजी भोर, सुदाम डेमसे, शशीकांत कोठुळे, महेश जोशी, दिगंबर मोगरे, प्रमोद लासुरे, अमोल सूर्यवंशी, विधानसभा प्रमुख विनायक आढाव, रोशन शिंदे, आदी उपस्थित होते.
'बुके नको, बुक द्या' असे आवाहन भुसे यांनी केले. या आवाहनाला पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. शिंदेसेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी पुस्तके, वह्या भेट देत, त्यांची पुस्तक तुला केली. भेटीत मिळालेल्या वह्या, पुस्तकांचे आदिवासी पाड्यातील गरजू मुलांना वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.