

नाशिक : शिक्षण क्षेत्रातील स्पर्धेच्या युगात गरीब विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळायला हवे. त्यामुळे विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून शिक्षणातील अडचणी दूर करून विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणार. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग मनापासून काम करेल, असे प्रतिपादन नवनिर्वाचित शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले. दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, असा इशाराही त्यांनी दिला.
मंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (दि.30) नाशिक जिल्ह्यातील शासकीय व खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण मंत्रीपदाचा पदभार स्विकारला. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री भुसे बोलत होते. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि चांगले शिक्षण मिळायला हवे, यासाठी मंत्री म्हणून आपण स्वत: आणि शालेय शिक्षण विभाग काम करणार आहे. शिक्षणातील सर्व अडचणी दूर करून येणाऱ्या काळात ‘रोड मॅप’ तयार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी येत्या आठ दिवसांत विद्यार्थी, पालक, शिक्षक, खासगी संस्था यांची बैठक घेऊन त्यांचे मनोगत जाणून घेणार आहे, असेही मंत्री दादा भुसे म्हणाले.
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची रोडावणारी संख्या, विद्यार्थी अभावी ओस पडणाऱ्या शाळांबाबत भूमिका स्पष्ट करताना मंत्री भूसे म्हणाले, विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या ही खरोखरच दुर्देवी बाब आहे. विद्यार्थ्यांची संख्या रोखण्यासाठी टप्प्याटप्याने मार्गक्रमण करणार आहे. याबाबत पालकांनी सहाकार्य करावे, असे आवाहन करत यासंदर्भात पालकांच्या सूचनाही विचारात घेतल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मिळण्यास झालेल्या विलंबाचा आढावा घेतला जाईल, असे स्पष्ट करताना भूसे म्हणाले, विद्यार्थ्यांना स्काऊट आणि गाईडचा ड्रेस दिला जाणार आहे. तालूका स्तरापर्यंत त्याचे कापड पोहोचले आहेत. त्याचे शिवणकाम करण्यासाठी ई-निविदा काढण्यास सांगितले असून येत्या २६ जानेवारी रोजी विद्यार्थी स्काऊड आणि गाईडचा गणवेश घालूनच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.