

मालेगाव : मालेगाब बाह्य विधानसभा मतदार संघाचे आमदार दादा भुसे यांना राज्य मंत्रीमंडळ विस्तारात अपेक्षेप्रमाणे पुन्हा कॅबिनेट मंत्रीपदी संधी मिळाली आहे. त्यांनी मंत्री पदाची शपथ घेताच शहरासह तालुक्यात शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत व ढोल-ताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला.
राज्याच्या महायुती मंत्रीमंडळाचा विस्तार रविवारी (दि. 15) रोजी नागपूर येथे संपन्न झाला. यात नाशिक जिल्ह्यातील तिघांची मंत्रीपदी वर्णी लागली. यात मालेगाव बाह्यचे मतदार संघातील आमदार दादा भुसे, दिंडोरी मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ तर सिन्नर मतदारसंघाचे आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे. या तीनही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेताच जिल्हाभरासह त्यांच्या मुळ मतदार संघ मालेगाव, दिंडोरी, सिन्नर येथे महायुतीच्या कार्यकर्त्त्यांनी तसेच पदाधिकार्यांनी जल्लोष केला. तसेच ठिकठिकाणी पेढे वाटत आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंद द्विगुणीत केला.
ना. भुसे हे सलग पाचव्यांदा मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. गत आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर सर्वांचेच लक्ष मंत्रीमंडळाच्या विस्ताराकडे लागले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार रविवारी (दि.15) नागपूर येथे पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी आ. भुसे यांना दुरध्वनी करून मंत्रीपदाच्या शपथविधीस उपस्थित राहण्यास सांगितले होते. भुसे यांना शिवसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाल्याने आपल्या नेत्याचा शपथविधी याची देही याची डोळा बघण्यासाठी शिवसैनिक नागपूरकडे रवाना झाले होते. ज्यांना जाणे शक्य नव्हते अशा नागरिक व शिवसैनिकांना शपथविधी सोहळा पाहता यावा यासाठी येथील शिवसेना संपर्क कार्यालयात एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. मंत्रीमंडळात ना. भुसे यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच शहरासह तालुक्यात शिवसैनिकांनी ठिकठिकाणी मिरवणुका काढून फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी संपर्क कार्यालयात अविष्कार भुसे यांच्यासह रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, राजेश अलिझाड, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2004 च्या विधानसभा निवडणूक भुसे यांनी दाभाडी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करीत माजीमंत्री प्रशांत हिरे त्यांचा पराभव करीत राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर 2009 मध्ये मालेगाव बाह्य मतदार संघ अस्तित्वात आला या निवडणुकीतही भुसे यांनी हिरे यांचा सलग दुसर्यांदा पराभव केला. 2014 मध्ये हिरेंचेच समर्थक भाजपचे पवन ठाकरे यांचा पराभव करत हॅट्ट्रीक साधली. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉ. तुषार शेवाळे यांचा पराभव करीत चौथ्यांदा विजयी होण्याचा मान मिळवला. त्यानंतर आता 2024 च्या निवडणुकीत त्यांनी त्यांचेच एकेकाळचे जिवलग मित्र अपक्ष बंडूकाका बच्छाव व पारंपरीक विरोधक शिवसेना उबाठा गटाचे अद्वय हिरे यांचा पराभव करून सलग पाचव्यांदा विजयी झाले. मंत्री भुसे यांनी यापूर्वी 2014 मध्ये युतीच्या शासनाच्या काळात पहिल्यांदा सहकार व ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर 2019 मध्ये आघाडी सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळाली. यावेळी त्यांना कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री पदाची जबाबदारी मिळाली. आता त्यांची पुन्हा फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. त्यांना कोणते खाते मिळते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.