

ठळक मुद्दे
देशातील पहिला आणि सर्वाधिक चलन छपाई करणारा चलार्थपत्र मुद्रणालय छापखाना
करन्सी नोटप्रेसमध्ये गेल्या तीन वर्षांत तब्बल १८ हजार ९४० मिलियन नोटांची छपाई
१३ नोव्हेंबर रोजी या छपाईखान्याचा शतकमहोत्सव साजरा केला जाणार
नाशिक : आसिफ सय्यद
नाशिकचे वैभव मानल्या जाणाऱ्या चलार्थपत्र मुद्रणालय अर्थात करन्सी नोटप्रेसमध्ये गेल्या तीन वर्षांत तब्बल १८ हजार ९४० मिलियन नोटांची छपाई करण्यात आली आहे. देशातील पहिला आणि सर्वाधिक चलन छपाई करणारा हा छापखाना देशाच्या चलनव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण अंग बनला आहे. येत्या १३ नोव्हेंबर रोजी या छपाईखान्याचा शतकमहोत्सव साजरा केला जाणार आहे.
नोटा छपाईसाठी अनुकूल वातावरण, मध्यवर्ती नाशिकरोड रेल्वेस्थानक आणि देवळाली लष्करी छावणी यामुळे इंग्रजांनी नाशिकरोड येथे देशातील पहिला चलनी नोटांचा छापखाना उघडण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम १९२४- २५ मध्ये सिक्युरिटी प्रेस नावाने छापखाना सुरू झाला होता. तेथे पोस्टाची तिकिटे, स्टॅम्प व इतर सरकारी कागदपत्रांची छपाई केली जाऊ लागली. नंतर १९२८ मध्ये चलनी नोटा छपाईसाठी करन्सी नोटप्रेस स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले. या छापखान्यात तयार झालेली पहिली नोट पाच रुपयांची होती.
स्वातंत्र्यानंतर नाशिकच्या छापखान्यावरील ताण कमी करण्यासाठी कर्नाटकातील म्हैसूर, मध्य प्रदेशातील देवास, पश्चिम बंगाल मधील सालबोनी येथे छपाईखाने उभे राहिले. १९६२ नंतर आयएसपी व सीएनपी हे दोन प्रेस स्वतंत्र करण्यात आले. २००६ मध्ये कॉर्पोरेटायझेशन दरम्यान उत्पादन सुविधा सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसपीएमसीआयएल)चे एक युनिट बनले. आयएसपी इंडिया सिक्युरिटी प्रेसमधून पासपोर्ट, मिलिटरी वॉरंट, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, भारतीय रिझर्व्ह बँकेचे धनादेश इत्यादींची छपाई केली जाते. तर सीएनपी करन्सी नोटप्रेसमधून फक्त नोटा छापल्या जातात. नाशिकच्या करन्सी नोटप्रेसमध्ये सद्यस्थितीत १६०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. सकाळी व सायंकाळी सात ते पाच दोन सत्रांत नोटा छपाईचे काम चालते. या छापखान्यात पाचशे, दोनशे, शंभर, पन्नास, २० व दहा रुपयांच्या नोटेची छपाई केली जात आहे.
येथे तयार केला जातो कागद आणि शाई
चलनी नोटा तयार करण्यासाठी कापसापासून विशिष्ट पद्धतीने तयार केलेला कागद आणि विशेष शाई वापरली जाते. या पेपरचा काही भाग महाराष्ट्राच्या करन्सी नोट प्रेसमध्ये आणि काही भाग मध्य प्रदेशातील होशंगाबाद पेपर मिलमध्ये तयार केला जातो. काही कागद जपान, ब्रिटन, जर्मनीतूनही आयात केला जातो. आॅफसेट शाई मध्य प्रदेशातील देवास येथून, नक्षीदार छपाईची शाई सिक्कीम येथून आणली जाते.
दहा रुपयाच्या नोटा छपाईचा खर्च सर्वाधिक
जेवढे नोटेचे मूल्य कमी तितका खर्च अधिक असतो. दहा रुपयांच्या नोटा छापण्यासाठी रिझर्व्ह बँकेला सर्वाधिक ९६ पैसे, २० रुपयांच्या नोटेसाठी ९५ पैसे खर्च येतो. ५० रुपयांच्या १००० नोटांसाठी ११३० रुपये, १०० रुपयांच्या १००० नोटांसाठी १७७० रुपये, २०० रुपयांच्या १००० नोटा छपाईसाठी २३७० रुपये आणि ५०० रुपयांच्या १००० नोटा छपाईसाठी २२९० रुपये खर्च येतो.
गत तीन वर्षांतील नोटांची छपाई
वर्ष नोटांची छपाई (कोटींत)
२०२३ - ५,३०० (कोटी)
२०२४ - ७००० (कोटी)
२०२५ - ६६४० (कोटी)
नाशिकच्या प्रेसला शंभर वर्षे पूर्ण आहेत. नाशिककरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. देशभरातील चलनी नोटांच्या कारखान्याच्या तुलनेत नाशिकमधील छपाई आजही सर्वोत्कृष्ट मानली जाते. व्यवस्थापन व कामगार यांच्या योग्य समन्वयातून नोटांचे विक्रमी उत्पादन होत आहे.
जगदीश गोडसे, जनरल सेक्रेटरी, आयएसपी व सीएनपी प्रेस