

सिन्नर (नाशिक) : संदीप भोर
सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीतील क्युपिड लिमिटेड ही कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध असून, या कंपनीत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास वेग घेत आहे. पोलिस तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, माजी प्रवर्तक ओमप्रकाश गर्ग आणि वीणा ओमप्रकाश गर्ग यांनी 2019 ते 2025 या काळात कंपनीचे सुमारे 200 कोटींच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात फसवणुकीची घटना प्रथम समोर आली, जेव्हा नव्या प्रवर्तकांना राजस्थानस्थित विकास लाइफ केअर या कंपनीकडून समन्स जारी झाले. तथापि, या प्रकरणी नव्या व्यवस्थापनाने तडजोड करून विकास लाइफ केअरला सुमारे 80 लाखांची रक्कम अदा करून प्रकरण मिटवले. त्यानंतर नव्या प्रवर्तकांनी कंपनीचे मागील काही वर्षांतील व्यवहार तपासले. ही कंपनी पूर्णत: निर्यातक्षम उत्पादन घेते. कंपनीच्या विद्यमान प्रवर्तकांच्या म्हणण्यानुसार, माजी प्रवर्तकांनी केनिया आणि दक्षिण आफ्रिका बाजारपेठेत उत्पादन बाजारभावापेक्षा कमी दरात विक्री करून कंपनीला मोठे आर्थिक नुकसान केले. याबाबत कोणतीही माहिती नव्या प्रवर्तकांना देण्यात आली नव्हती, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
कंपनी विषयी : क्युपिड लिमिटेड ही माळेगाव, ता. सिन्नर येथे असलेली कंपनी आहे, जी पुरुष आणि महिला कंडोम, वैयक्तिक वंगण (लुब्रिकंट्स) आणि इन-विट्रो डायग्नोस्टिक्स (आयव्हीडी) किटचे उत्पादन करते. ही कंपनी 1993 पासून कार्यरत आहे. डब्लूएचओ/युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडकडून पुरुष आणि महिला कंडोमच्या पुरवठ्यासाठी पूर्व-पात्रता दर्जा मिळवणारी जगातील पहिली कंपनी आहे.
क्युपिड लिमिटेड मधील माजी प्रवर्तकांच्या विक्री धोरणांमुळे कंपनीचा आर्थिक तोटा आणि माहिती लपवण्याच्या आरोपांमुळे नवीन प्रवर्तकांना आर्थिक फटका बसला असल्याचे त्यांच्या फिर्यादीतून स्पष्ट होत आहे. पोलिस तपास सुरू असून, कंपनीचे नियमित उत्पादन, व्यवहार मात्र सुरळीत सुरू असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. कागदपत्रांची पडताळणी करून तपासाला गती दिली आहे.
भरत जाधव, पोलिस निरीक्षक, एमआयडीसी
पूर्वीच्या व्यवहारांची लपवाछपवी
माजी प्रवर्तकांनी आफ्रिकन बाजारपेठेत उत्पादने कमी दरात विकल्याने कंपनीचा नफा घटल्याची शक्यता आहे. आर्थिक पत्रकांमध्ये याची स्पष्ट नोंददेखील नसावी. 2023-24 मध्ये व्यवस्थापनात बदल आणि शेअर हस्तांतरण झाले. नव्या व्यवस्थापनाने कंपनीची सूत्रे हाती घेतली. मात्र पूर्वीच्या व्यवहारांबाबत सर्व माहिती पारदर्शकपणे देण्यात आली नव्हती.
अनियमित व्यवहार; सेबीची दंडात्मक कारवाई
उत्पादनांची बाजारभावापेक्षा कमी भावात विक्री केली. तसेच इन्स्पेक्शनचे जास्तीचे चार्जेस लावून स्वत:चा फायदा करून घेतला. परिणामी कंपनीचा नफा घटला. नव्या प्रवर्तकांनी चुकीच्या आर्थिक आकड्यांच्या आधारे गुंतवणूक केली असण्याची शक्यता आहे. व्यवहारात अनियमितता आढळल्याने सेबीने कंपनीला 19.51 लाख तर बीएसई-एनएसईने 17.93 लाख असा सुमारे 37.50 लाखांचा दंडही केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. या सगळ्या प्रकरणात कंपनीची जागतिक स्तरावर पत ढासळली असून, काही खरेदी करारही रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.