

नाशिक : दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. या अवकाळी पावसाने कांदा, द्राक्ष, मका पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सरासरी 45.4 मी.मी. पावसाची नोंद झाली. गत दहा बारा दिवसांत पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे अतिवृष्टीतून वाचलेली 30 ते 40 टक्के पिके हीच शेतकर्यासाठी या हंगामाचा आधार होती. मात्र, या पावसाने तोही घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अस्मानी संकट कोसळले आहे.
शनिवारी (दि.25) रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रभर शहरात पाऊस झाला. रविवारीही (दि.26) दिवसर ढगाळ वातारण होते. अधुन मधुन पाऊस सुरुच होता.शनिवारी सायकाळी सातपासुन पावसाला सुरवात झाली.सकाळ पर्यंत जिल्ह्यात सरासरी 45.4 मि.मी पावसाची नोंद झाली. देवळा, येवला येथे ढगफुटी सद़ृष्य पाऊस झाल्याने संपूर्ण गावांची आणि तालुक्यांची दाणादाण उडाली. जिल्ह्याच्या द्राक्ष पट्ट्यात ऑक्टोबर द्राक्ष छाटणीला सुरुवात झाली.मात्र पावसामुळे या सर्व कामांना ब्रेक लागला. गेल्या मे महिन्यापासून पावसाने मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे द्राक्ष बागा अगोदरच अडचणीत आहे. त्यात या पावसामुळे पुन्हा नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पाणी साचल्याने फवारणी करता येत नसल्याची परिस्थिती आहे. अवकाळी पावसाने नदी-नाल्यांना पूर आला आहे. शेतातील द्राक्षसह टोमॅटो, सोयाबीन तसेच सर्व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी निसर्गापुढे हतबल झाल्याचे चित्र आहे. गत सहा महिन्यापासून तालुक्यात पाऊस पडत असल्याने सर्वच पिकांची नासाडी झाली आहे. अति पाऊस पडत असला तरी बळीराजाने खरीप हंगामातील सर्वच पिके मोठ्या मेहनतीने घेतली. मात्र, पावसाने झालेल्या नुकसानीने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या सहा महिन्यापासून सतत पडणार्या पावसामुळे द्राक्षशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. चालू हंगामात 50 टक्के द्राक्ष वेलीवर घडच निघाले नसल्याने द्राक्ष बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.निफाड तालुक्यातील पुर्व भागातील खेडलेझुंगे, कोळगाव, सारोळे थडी, ब्राह्मणवाडे, करंजी खुर्द, तामसवाडीसह आदी गावांमध्ये रात्रभर झालेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकर्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात मका, सोयाबीन, कांदा आणि उन्हाळा कांदा रोप यासह द्राक्ष बागांचा समावेश आहे.
तालुका निहाय पावसाची नोंद मि. मी मध्ये
मालेगाव ( 30.7)
बागलाण ( 56.1)
कळवण ( 53)
नांदगाव 39.1)
सुरगाणा ( 35.4)
नाशिक ( 35.9)
दिंडोरी (47.1)
इगतपुरी (38.2)
पेठ (36.3)
निफाड ( 50.6)
सिन्नर 49.6)
येवला ( 62.5)
चांदवड ( 51.5)
त्र्यंबक (28.3)
देवळा (77 .
मुसळधार स्वरुपातील अवकाळी पाऊस कांद्यालाही नुकसानकारक आहे. ज्यांचा कांदा काढणीवर आला आहे, त्यांचे नुकसान होणार आहे. चालू वर्षात कांद्याला भाव मिळाले नाहीत. या स्थितीत उन्हाळ कांदा लागवडीस उत्पादकांनी २५०० ते २६०० रुपये किलो दराने महागडी बियाणे खरेदी करून रोपे तयार के ही रोपे नाजूक असतात. अवकाळीत त्यांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी झळ बसणार आहे.
भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना
दृष्टीक्षेपात झालेले नुकसान
काढणीला आलेला मका, सोयाबीन शेतातच भिजंल्याने त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम
काही ठिकाणी कांद्याची रोपे चिखलात बुडाली, लाल कांद्याचे मोठे नुकसान
चाळीत खराब होत असलेला कांदा वाळवणीसाठी बाहेर उन्हात पसरविलेला कांदा भिजला
जनावरांचा चारा, मक्याची कणसे भिजल्याने खराब होण्याची शक्यता
सिध्द पिंप्रीत चार तास धो-धो पावसाची नोंद
भाटगाव ( ता. निफाड ) येथे अण्णासाहेब मिटके यांच्या घराची भिंत पडुन नुकसान
द्राक्ष बागेत पाणी साचल्याने बागांना फटका