

नाशिक : गेल्या आठ दिवसांत झालेल्या पावसाचा जिल्ह्यातील शेतीला चांगलाच फटका बसला असून, सुमारे 10 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील दिंडोरी, इगतपुरी, निफाड, चांदवड आदी तालुक्यांतील मका, सोयाबीन, भात, टोमॅटो आदी पिकांसह द्राक्षे, आंबा, सीताफळ, डाळिंब या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे जिल्ह्यातील सुमारे 121 गावे बाधित झाली असून, 18 हजार 945 शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. यंदाच्या मोसमात परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला. गत आठवड्यात 22, 23 आणि 24 ऑक्टोबर दरम्यान एकूण 95.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ऐन पिके कापणीच्या मोसमात अवकाळीने दणका दिल्याने जिल्ह्यातील 4 तालुक्यांमधील 10 हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे.
दिंडोरी, इगतपुरी, निफाड, चांदवड आदी भागांत परतीच्या पावसाने कहर केला. यामुळे दिंडोरीतील 15 गावे बाधित झाली, तर 229 शेतकर्यांचे नुकसान झाले. इगतपुरीतील 51 गावे बाधित झाली असून, सुमारे 2 हजार शेतकर्यांचे नुकसान झाले. निफाडमध्ये 30 गावांतील शेतकर्यांच्या पिकांना फटका बसला असून, सुमारे 2800 शेतकरी बाधित झाले आहेत. तर चांदवडमध्ये 25 गावांमधील 13 हजार 846 शेतकर्यांवर अवकाळीची कुर्हाड कोसळली.
दिंडोरीत 45 हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले. इगतपुरीत भातपिकाचे 1,022 हेक्टर शेतपिके उद्ध्वस्त झाली. निफाडमध्ये 411 हेक्टरवर लावण्यात आलेल्या मक्याच्या पिकांचे नुकसान झाले, तर सोयाबीन 391 हेक्टर, कांदा 130 हेक्टर खराब झाला. चांदवडमध्ये मका 2,175 हेक्टर, सोयाबीन 74 हेक्टर, कांदा 130 हेक्टर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बाधित शेतकर्यांनी शेतपिकांचा त्वरेने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची शासनाकडे मागणी केली आहे.
चार तालुक्यांतील सुमारे 121 गावे बाधित झाली असून, 18 हजार 945 शेतकर्यांनी शेतपिकांचा पंचनामा करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यातील जिरायत क्षेत्रातील एकूण 4,158 हेक्टर बागायत क्षेत्रातील 5,569 हेक्टर, तर बहुवार्षिक फळपिकांचे एकूण 402 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.