Kashmir to Kanyakumari | काश्मिर ते कन्याकुमारी ४ हजार किमी अंतर ४४ दिवसांत कापले

गिनीज बुकमध्ये नोंद : निफाड तालुक्यातील शेतकरीपुत्राचा विश्वविक्रम
Kashmir to Kanyakumari
वैभव वाल्मीक शिंदेPudhari
Published on
Updated on

नाशिक : येथील मविप्र संस्थेचा माजी विद्यार्थी आणि निफाड तालुक्यातील तामसवाडीतील शेतकऱ्याच्या मुलाने अवघ्या ४४ दिवसांत काश्मीर ते कन्याकुमारी हे ४ हजार ११२ कि.मी. अंतर धावत पूर्ण केले. त्याच्या कामगिरीने जागतिक विक्रमाला गवसणी घातली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली.

वैभव वाल्मीक शिंदे असे या विक्रमवीराचे नाव असून, त्याने ११ नोव्हेंबरला सुरू केलेली ही मोहीम २६ डिसेंबर रोजी यशस्वी फत्ते केली. तामसवाडीत वैभवचे प्राथमिक शिक्षण गावातच 'मविप्र'च्या जनता विद्यालयात झाले, तर माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मविप्रच्याच मांजरगाव येथील जनता विद्यालयात झाले. धावण्याच्या स्पर्धेतच दुखापत झाल्याने मध्ये काही काळ त्याचे धावणे थांबले. परंतु त्याचे मन स्वस्थ बसू देत नसे. दरम्यान, दिल्लीमध्ये सुफिया खान या प्रशिक्षकाबरोबर त्याची भेट झाली. त्यांनी महाराष्ट्रातून अद्याप असा विक्रम कोणी केला नाही, असे सांगताच वैभवने 'विक्रमा'वर नाव कोरण्याची खुणगाठ बांधली.

डिसेंबर २०२१ पासून नाशिकमधील सायकलिस्ट डॉ. महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने दररोज २ ते ३ तास सराव सुररू ठेवला. तीन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी काश्मीरच्या श्रीनगरमधील लाल चौकातून वैभवने मोहिमेला सुरुवात केली. प्रतिकूल हवामानाची तमा न बाळगता दिवस-रात्र धावत वैभवने विक्रमी कमी वेळेत काश्मीर ते कन्याकुमारी अंतर पूर्ण करून 'सोल रन'मध्ये इतिहास रचला. या विक्रमाबद्दल मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाने कौतुक केले आहे. वैभवला यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तामसवाडीचे गुरुदेव कांदे यांचे सहकार्य लाभले.

शेतकरी कुटुंबातून असल्याने जागतिक स्तरावर विश्वविक्रम करण्याचे स्वप्न बघणे हा महागडा प्रवास वाटायचा. परंतु सुरुवात केल्यावर चारही बाजूने मदत झाली. ग्रामीण भागातून तरुणांनी पुढे येण्याचे धाडस करायला हवे. जेणेकरून अजून असे विश्वविक्रम भारताच्या नावे होतील.

- वैभव शिंदे, विश्वविक्रमवीर, तामसवाडी, निफाड

मविप्रचा माजी विद्यार्थी असलेल्या वैभवची कामगिरी अभिमानास्पद असून, संस्थेच्या अन्य विद्यार्थ्यांसाठी त्याचे यश प्रेरणादायी आहे. वैभवच्या या कामगिरीनेही संस्थेच्या नावलौकिकात भर पडणार आहे.

- ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, 'मविप्र संस्था, नाशिक

५२ दिवसांचा विक्रम मोडला

काश्मीर ते कन्याकुमारी हे ४ हजार ११२ कि.मी. अंतर यापूर्वी सन २०१९ मध्ये हरियाणा येथील संजयकुमार आणि रतनकुमार या दोघांनी पूर्ण केले आहे. त्यावेळी त्यांना हे अंतर पार करण्यासाठी ५२ दिवस ४ तास ४० मिनिटे इतका कालावधी लागला होता. महिलांमध्ये दिल्लीच्या सुफिया सुफी यांनी ८७ दिवसांमध्ये हे अंतर पूर्ण केल्याची नोंद आहे.

असा होता दिनक्रम

दररोज सरासरी ९० ते १०० किमी धावणे हा दिनक्रम वैभवने ठरवून घेतला होता. 'सोल रन' पूर्ण करण्यास किती दिवस लागतील, याचा अंदाज नसल्याने प्रारंभी काही दिवस रनिंगमध्ये जेवण केले.

…असा केला सराव

वैभवने तीन वर्षांपूर्वी डॉ. महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज दोन ते तीन तास धावण्याचा सराव सुरू केला होता. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे दररोज वैभवचा सराव सुरू असायचा. सरावादरम्यान वैभवने नाशिक ते शिर्डी हे अंतर भर पावसात साडेअकरा तासांत, तर नाशिक ते मालेगाव हे अंतर ४२ अंश सेल्सिअस तापमानात १४ तासांत पूर्ण केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news