

नाशिक : आशियातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंडसारख्या देशांमध्ये नवीन रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. यातच, मुंबईतील केईएम रुग्णालयात कोरोनाने दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी सोमवारी (दि.19) येऊन धडकली. मात्र हे मृत्यू कोरोनामुळे झाले नसून इतर गंभीर आजारांमुळे झाल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.
खबरदारी घेत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपक्रेंद्रात तपासणी वाढविण्याचे निर्देश दिल्याची माहिती सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. राजेंद्र बागुल यांनी दिली.
याबाबत, सोमवारी (दि.19) रोजी सायंकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर मोरे व डाॅ. बागुल यांनी सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी व्हीडीओ काॅन्फरन्सव्दारे तात्काळ संवाद साधला. प्राथमिक आरोग्य केंद्र असो की, उपकेंद्र येथे येणाऱ्या ताप, सर्दी व खोकला रुग्णांची तपासणी करण्यात यावी. मे महिन्यात अवकाळी व गारपीट होत असल्याने वातावरणात मोठा बदल झाला आहे. या बदल्या वातावरणामुळे ताप, खोकला व सर्दीचे रुग्ण वाढले आहे. यात सतत ताप येत असेल अन् खोकला थांबत नसल्यास तात्काळ चाचणी करून घेण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना यावेळी डाॅ. बागुल यांनी दिले. श्वसनाच्या आजाराचे रुग्ण आरोग्य केंद्रात दाखल झाल्यानंतर त्यांची तपासणी करून त्यांना तात्काळ उपचार देण्याच्या सूचनाही डाॅ. मोरे यांनी यावेळी दिल्या.
कोविड-19 चा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी जि.प. आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. जानेवारी ते एप्रिल 2025 पर्यंत कोविड रुग्णांची संख्या खूपच कमी आढळून आली आहे. परंतु मे महिन्यांत झालेल्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप व खोकल्याचे रुग्ण वाढले आहे. यात स्वाईन फ्लू व कोरोना होण्याची शक्यता आधिक आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रांमध्ये संशयित रुग्णांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहे.
डाॅ. राजेंद्र बागुल, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.