

नाशिक : नाशिक शहरात थंडीचा जोर वाढत चालला असताना त्याचा परिणाम थेट भाजीबाजारावर दिसू लागला आहे. नोव्हेंबरमध्ये वाढलेल्या थंडीमुळे भाजीपाल्याची आवक घटली असून, बाजारात गेल्या आठवड्याभरात दरांनी चांगलीच उसळी घेतली आहे. यामुळे हिवाळ्यात आरोग्यदायी हिरव्या भाज्यांसाठी नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे.
कोथिंबीरने पुन्हा ५० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, तर मेथी, पालक, कांदापात व इतर फळभाज्याही ५० रुपयांच्या आसपास दराने विक्रीस येत आहेत. पंचवटी बाजार समितीतील नोंदणीतून भाव वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यात भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तुटवडा निर्माण झाला होता. आता थंडी वाढली आहे आणि भाजीपाला चांगल्या दर्जात येत असला तरी आवक कमी असल्याने घाऊक भाव वाढले आहेत. मागील महिन्याच्या तुलनेत दर काहीसे कमी झाले असले तरी शेतकरी सध्याच्या बाजारभावावर समाधानी आहेत. याच दरम्यान मागील महिन्यात कोथिंबीर १५० रुपयांवर पोहोचली होती, तर मेथी, पालक यांनीही शंभरी पार केली होती.
रविवारी पंचवटी बाजार समितीत कोथिंबीर ४,४०० जुड्यांची आवक नोंदवली गेली. यात २,४०० गावठी व २,००० हायब्रीड कोथिंबीर जुड्या विक्रीस आल्या. हायब्रीड कोथिंबीर प्रतिशेकडा ५,९०० रुपये दराने विकली गेली. मेथीची ९,००० हून अधिक शेकड्यांची आवक होऊन ४,४२० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. तर पालक १,५०० शेकड्यांपर्यंत येऊन ४,६०० रुपये प्रतिशेकडा दराने विकला गेला.