

कळवण (नाशिक) : कोथिंबिरीला बाजारात कवडीमोल भाव मिळाल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतातील पिकावर रोटर फिरवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
कळवण तालुक्यातील मानूर येथील शेतकरी मुकुंद भीमराव पवार यांनी महिन्याभरापूर्वी दोन एकर शेतात कोथिंबीर पिकाची लागवड केली होती. पिकासाठी त्यांनी मेहनत, खत, औषध, पाणी आणि मजुरी यावर तब्बल ५० हजार रुपये खर्च केले.
मात्र सध्याच्या बाजारभावानुसार कोथिंबिरीला कवडीमोल दर मिळत असल्याने, तसेच विक्रीसाठी बाजारात नेण्याचाही खर्च परवडत नसल्याने, पवार यांनी अखेर रोटर फिरवून पिक जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. विक्री करूनही खर्च निघणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी हा पाऊल उचलले.
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांत हळहळ व्यक्त होत असून, शेतकऱ्यांचा आर्थिक कोंडमारा कधी थांबणार आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू कधी फुलणार असा सवाल उपस्थित होत आहे. शेतमालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.