नाशिक : सन २०१६ मध्ये खातेअंतर्गत सरळ सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १२५ व्या तुकडीतील १११ प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक मंगळवारी (दि. २९) पोलिस दलात सहभागी झाले. महाराष्ट्र पोलिस अकादमीत झालेल्या दीक्षांत संचलन सोहळ्याप्रसंगी राज्य दहशतवादविरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक नवल बजाज यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अकादमीचे संचालक राजेश कुमार, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ए. डी. जी. बजाज यांनी मार्गदर्शन केले. नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन कामात प्रशिक्षणाची सांगड घालत समाजातील गरजू घटकांना संकटात आवश्यक ती कायदेशीर मदत करावी. ती करताना संवेदनशीलता महत्त्वाची आहे. आपले वर्तन पक्षपाती नसावे. व्यवहार सौहार्दपूर्ण असावेत. कम्युनिटी पोलिसिंग ही महत्त्वाची बाब आहे. गुन्ह्याचे सबळ पुरावे शोधून पीडितांना न्याय मिळवून द्यावा. आधुनिकतेची कास धरून तरबेज व्हावे. सेवा निष्कलंक ठेवावी. धर्म, जात ही केवळ 'खाकी' आहे. खाकीतील चांगला माणूस म्हणून सिद्ध करा. द्वेष, राग कोणाविषयी न ठेवता घेतलेल्या शपथेला जागावे, असेही ते म्हणाले.
या तुकडीत ९८ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश होता. दीक्षांत संचलनाचे मुख्य कमांडर चंद्रकांत उत्तम जाधव होते. निशाण टोळीने राष्ट्रध्वज आणि अकादमीच्या ध्वजाचे शानदार संचलन केले. त्यानंतर अकादमीचे संचालक राजेश कुमार यांनी उपनिरीक्षकांना कर्तव्याची शपथ दिली. प्रशिक्षणार्थींनी ऐटीत संचलन करून मान्यवरांना मानवंदना देत अधिकारी पदाने सेवेत 'पहिले पाऊल' टाकले.
सन २००८ मध्ये नाशिक ग्रामीण पोलिस दलात भरती झालो. गुन्हे शाखा, ओझर विमानतळ सुरक्षा, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कामगिरी केली. सन २०१६ मध्ये पहिल्या प्रयत्नात खात्यांतर्गत उपनिरीक्षक झालो.
सुनील अमृत भामरे, सेकंड बेस्ट, नाशिक.
चेतनलाल धनुलाल पटले : रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर, बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच, यशवंतराव चव्हाण वर्ल्ड कप बेस्ट ऑल राउंडर कॅटेड ऑफ द बॅच, डॉ. बी. आर. आंबेडकर बेस्ट कॅप इन लॉ, बेस्ट कॅडेट इन स्टडिज सिल्व्हर बॅटेन.
सुनील अमृत भामरे : सेकंड बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच.
केशरसिंग फुलसिंग जारवाल : एन. एम. कामटे गोल्ड कप फॉर बेस्ट कॅडेट इन रायफल अॅण्ड रिव्हॉल्व्हर शूटिंग, बेस्ट कॅडेट इन आउटडोअर.
चंद्रकांत उत्तम जाधव : बेस्ट कॅडेट इन ड्रिल.
अयोध्या प्रकाश घोरपडे : अहिल्याबाई होळकर कप बेस्ट ऑल राउंड वूमन कॅडेट ऑफ द बॅच.
१२५ व्या तुकडीचे प्रशिक्षण २९ जानेवारी ते २८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत झाले. या तुकडीतील अनेक अधिकाऱ्यांनी कर्मचारी असताना पोलिस महासंचालक पदक पटकावले आहे. ९८ अधिकारी पदवीधर, तर तिघे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असून, तुकडीचे सरासरी वय ३६ ते ४० वयोगटात होते. सर्वाधिक ४१ अधिकारी पश्चिम महाराष्ट्रातील असून, मराठवाड्यातील १४, २९ कोकणातील, २० विदर्भ आणि सात उत्तर महाराष्ट्रातील आहेत.
बी.एस्सीनंतर पोलिस प्रशासन विषयात बीए केले. अकरा वर्षे नक्षलग्रस्त भागात, गडचिरोलीतल्या स्पेशल ॲक्शन ग्रुपसह मोक्का, एमपीडीए व गुन्हे पथकात कामगिरी बजावली. अंमलदार असताना खडतर सेवा, अंतरिक्ष सेवा व पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित झालो आहे. यापुढेही निर्भिड कामगिरी सुरू ठेवेन.
चेतनलाल धनुलाल पटले, रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनरचे मानकरी, नाशिक.