

नाशिक : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून यलो अलर्ट जारी करण्यात आला. या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. दरम्यान, सोमवारी (दि.27) हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी पुन्हा यलो अलर्ट जारी केला असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
दि. ८ ते १२ ऑक्टोबर दरम्यान परतीच्या पावसाची सुरुवात झाली होती. त्यानंतर हवामान खात्याने आकाश निरभ्र राहील असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, अचानक गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वाधिक १६१ टक्के पाऊस बरसला. या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.
अवकाळी पावसामुळे तब्बल ४८ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, सर्वाधिक फटका मका पिकाला बसला आहे. यासह सोयाबीन, भात, कापूस, कांदा आणि भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यात जोरदार पावसामुळे द्राक्ष पिकावर मोठा परिणाम होणार आहे. अजून तीन दिवस पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने नागरिक व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
३ दिवसांत जिल्ह्यात १६१ टक्के पाऊस
तालुका - पावसाची टक्केवारी
बागलाण - २५२
देवळा - २२७
चांदवड - २२०
मालेगाव - १९९
कळवण - १८९
येवला - १६५