

पिंपळनेर : माणसाचा मेंदू हे सर्वात मोठे शस्त्र आहे. या शस्त्राचा वापर करण्यासाठी शब्दांची धार असायला हवी. आज समाजात असहिष्णुता वाढत असताना परमतांचा आदर करणे आणि संविधानाच्या चौकटीत राहून सहिष्णुतेने वादविवाद करणे काळाची गरज आहे. संघर्षाला सहिष्णुतेची आणि अभ्यासाला नैतिकतेची जोड द्या, असे मौलिक प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड किशोर ढमाले यांनी केले. कर्मवीर आ. मा. पाटील ऊर्फ बंडू बापूजी यांच्या ४५ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
माहिती आणि ज्ञानात फरक आहे. ज्यांनी 'का?' हा प्रश्न विचारला, तेच थोर संत आणि महात्मा पदापर्यंत पोहोचले. संत नामदेवांपासून गाडगेबाबांपर्यंत आणि महात्मा फुलेंनी प्रश्न विचारले म्हणूनच समाजपरिवर्तन झाले. तंत्रज्ञान योग्य की अयोग्य? मानवी मन विचारशील आहे. तंत्रज्ञानाचा वापर करताना आपल्या प्रथा आणि परंपरांचा विसर पडू देऊ नका. चिकित्सक दृष्टी आणि चिंतन-मनन काळाची गरज आहे. इतरांचे मत पटले नाही तरी ते मांडण्याचा त्यांचा अधिकार आपण मान्य केला पाहिजे. सत्याची कास धरून स्वतःपासून बदलाची सुरुवात करावी, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ए. एस. बिरारीस होते. प्रमुख पाहुणे सुरेश निकुंभ यांनी बापूजींच्या 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी'चा गौरव केला. बापूजींची नात अर्चना निकम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, "शिक्षक हा शाळेचा आत्मा आहे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देऊन आपले पवित्र कार्य निष्ठेने पार पाडावे," असे आवाहन केले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब आर. एन. शिंदे, सुभाष शेठ जैन, प्राचार्य डॉ. एल. बी. पवार यांच्यासह अनेक शिक्षणतज्ज्ञ व मान्यवर उपस्थित होते.