

नाशिक : समृद्धी महामार्गावरील आमने रोड बीकेसी, नोएडा प्रमाणे विकसित होणार असल्याने या भागातील नाशिक महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 28) समृद्धी महामार्गावरील आमने रोड कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे, मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड, सा. बां. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, रस्ते सचिव दशपुते उपस्थित होते.
भविष्यात ठाणे, रायगड, पालघर या भागाला आमने नोड जोडला जाणार असून, भविष्यातील औद्योगिक क्षेत्र म्हणून ते विकसित होणार आहे. या भागाचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीएची नियुक्ती करण्यात आली आहे. आमने नोड 10 हजार 791 हेक्टर क्षेत्र असून, त्याठिकाणी इंडस्ट्री पार्क, लॉजिस्टिक हब, अॅग्रीकल्चर हब, फूड प्रोसेसिंग पार्क आदी विकासकामे प्रस्तावित आहेत. या भागातून जाणार्या नाशिक महामार्गाचे काम वेळेत आणि पावसाळ्यापूर्वी करण्याचे निर्देश देतानाच वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आमने रोडकडून नाशिक, मनोर वाडा रस्ता, जेएनपीएकडे जाणार्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्याय शोधावेत. वाहतूक नियंत्रित करताना अवजड वाहनांसाठी वेळेचे नियमन तसेच ट्रॅफिक वॉर्डनची संख्या वाढवण्याचे आदेशही यावेळी शिंदे यांनी दिले.
नाशिक : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील नाशिक-मुंबई दरम्यान शेवटच्या टप्प्यातील तीन पॅकेजचे काम पूर्ण झाले आहे. येत्या 1 मे रोजी या बोगद्यांचे लोकार्पण होत आहे. समृद्धी मार्गावरील 1 ते 16 पॅकेजमधील अंतिम तीन म्हणजेच 14 ते 16 हे भुयारी मार्ग सर्वाधिक आव्हानात्मक मानले जात होते. घोटी-इगतपुरी-बिरवाडी-वाशाळा ते आमणे या मार्गाची उभारणी करताना अत्यंत खडतर डोंगरातून हे मार्ग निर्माण करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ज्या भागातून हा समृद्धी महामार्ग गेला आहे त्या भागातील संस्कृती, तेथील महत्त्व बोगदा परिसरात व महामार्गाच्या आजूबाजूला दाखविण्यात आली आहे. यात शेवटच्या टप्प्यातील 15 आणि 16 पॅकेजमध्ये आदिवासी संस्कृती दर्शविणारी वारली पेंटिंग नक्कीच प्रवाशांना मोहित करणारी ठरणार आहे.