नाशिक : प्रफुल्ल पवार
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या 2800 'कॉमन सर्व्हिस सेंटर' (सीएससी) आणि 'आपले सरकार सेवा केंद्रां'च्या कार्यपद्धतीची विशेष गुणवत्ता तपासणी करण्यात येणार असून, नियमानुसार सेवा न देणाऱ्या केंद्रांवर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत ही तपासणी पूर्ण केली जाणार असून राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत नागरिकांना विविध शासकीय सेवा ऑनलाइन पद्धतीने मिळाव्यात, या उद्देशाने राज्यभर सीएससी व आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांसाठी शासनाने ठरवून दिलेले निकष, दरपत्रक, तसेच केंद्र चालकांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र, काही केंद्र चालकांकडून सेवा देताना अनियमितता, ठरवलेल्या दरांपेक्षा अधिक शुल्क आकारणे, तसेच 'पीएम किसान', 'अॅग्री स्टॅक' यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये नागरिकांना अपेक्षित सहकार्य न मिळाल्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहे.
या पार्श्वभूमीवर महाआयटी समन्वय अधिकारी यांच्याकडून केंद्रांची तपासणी करण्यात येणार असून, त्याचा सविस्तर अहवाल संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. दोष आढळल्यास सुनावणीची संधी देऊन नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या प्रक्रियेवर अपिलीय अधिकार राहणार आहेत.
शासन निर्णयानुसार प्रत्येक वर्षी ३१ जानेवारीपूर्वी सेवा केंद्रांचे गुणवत्ता मूल्यमापन करणे बंधनकारक आहे. नागरिकांना दर्जेदार, पारदर्शक आणि शासन नियमांनुसार सेवा मिळावी, यासाठी ही विशेष तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व सीएससी केंद्रांची नियमानुसार तपासणी करण्यात येणार आहे. सर्व तालुक्यांना तपासणीसाठी स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक
या दिल्या आहे सूचना
तहसीलदारांनी सीएससी केंद्रांची यादी तयार करून ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे प्रसिद्ध करणे, ३१ जानेवारीपूर्वी विशेष तपासणी व गुणवत्ता मूल्यांकन, १५ डिसेंबर ते १५ जानेवारीदरम्यान तपासणी पूर्ण करण्याचे आदेश, शासनाने निर्धारित केलेला नमुना तपासणी फॉर्म वापरणे, ग्राहकांना दूरध्वनीद्वारे सेवा व आकारलेल्या शुल्काबाबत विचारणा,
तालुकानिहाय सीएससी केंद्र
तालुका - संख्या
बागलाण- २३२
चांदवड- १६८
देवळा- ९७
दिंडोरी- १९२
इगतपुरी- १७७
कळवण- १४०
मालेगाव- १९९
नांदगाव- ११९
नाशिक- १४४
निफाड- २६५
पेठ- ९८
सिन्नर- २०७
सुरगाणा- ४३
त्र्यंबकेश्वर- ७३
येवला- १४७
अप्पर तहसील कार्यालय, नाशिक- ४३५