

दिंडोरी (नाशिक) : नागरिकांचे प्रश्न थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचावेत आणि समस्यांचे त्वरित निराकरण व्हावे, यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘क्यूआर कोड संवाद माध्यम’ या अभिनव उपक्रमाची दिंडोरीत सुरुवात करण्यात आली आहे
या माध्यमातून नागरिकांना मोबाइल माध्यमातून थेट मंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. युवानेते गोकुळ झिरवाळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला आहे. नागरिकांना विविध विषयांवरील प्रश्न, सूचना, समस्या अथवा विभागनिहाय अडचणी क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन फॉर्मद्वारे मांडता येणार आहेत. त्यानंतर ही माहिती थेट मंत्री झिरवाळ यांच्या मोबाइलवर पोहोचणार असून ते स्वतः त्याचा पाठपुरावा करतील.
मंत्री झिरवाळ म्हणाले, राज्याचा कारभार बघताना मतदारसंघातील जनतेशी सततचा संवाद कायम राहावा, त्यांच्या अडचणी थेट माझ्यापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी हे संवाद माध्यम सुरु केले आहे. या उपक्रमाच्या शुभारंभास मंत्री झिरवाळ, कादवा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर, बाळासाहेब जाधव, विश्वासराव देशमुख, अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, प्रकाश शिंदे, प्रकाश वडजे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, युवक अध्यक्ष कृष्णा मातेरे, शहराध्यक्ष प्रतीक जाधव, परीक्षित देशमुख, ॲड. सचिन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर क्यूआर कोड तहसील तसेच पंचायत समिती कार्यालयात लावण्यात आले आहे. हा अभिनव उपक्रम नागरिकांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून शासन दरबारी पोहोचण्याचा एक नवा प्रभावी मार्ग ठरणार आहे.