

ठळक मुद्दे
पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्यासाठी शासनाने पावले
शासन निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याची तरतूद
स्वतंत्र बाजार समिती स्थापन झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार
पंचवटी (नाशिक) : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. याबाबत पडताळणीसाठी महाराष्ट्र राज्य पणन संचालनालय, पुणे यांनी आदेश निर्गमित केले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. चौकशी करून आठवड्यात वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे कार्यालयास आदेशित करण्यात आले आहे.
शासन निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक बाजार समितीचे विभाजन करून पेठ व त्र्यंबकेश्वर येथे नवीन समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक माहिती संकलित करून शासनाला अहवाल सादर करण्याची जबाबदारी समितीवर सोपवण्यात आली आहे. यात त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यांमध्ये नवीन बाजार समिती स्थापन करावयाची झाल्यास त्या दोन तालुक्यांमध्ये एक बाजार समिती स्थापन करावी अथवा तालुकानिहाय स्वतंत्रपणे कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करावी, तालुक्यामध्ये बाजार समिती स्थापन करावयाची झाल्यास आवश्यक असणारी जमीन उपलब्ध आहे का, दोन्ही तालुक्यांमध्ये बाजार समिती स्थापन केल्यास शेतकऱ्यांना फायदा हाईल का, आर्थिक बाबीची तरतूद कशी करण्यात येणारी आहे. उपबाजार असतील तर तेथील मालाची आवक-जावक, आर्थिक उलाढाल माहिती, नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीची मालमत्ता, कर्मचारीवृंद विभाजन, कृषि उत्पन्न (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील तरतुदीनुसार नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती विभाजनाबाबत सत्यता पडताळणी असे एकूण सात मुद्देनिहाय चौकशी करून पुराव्यापृष्ठर्थ्य कागदपत्र व अभिप्रायासह एका आठवड्यात वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करणेबाबत आदेशित करण्यात आले आहे.
सध्या पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी नाशिकला आणावा लागतो. यातील जवळपास पेठ ते नाशिक ५५ ते ५८ किलोमीटर आहे. त्र्यंबकेश्वर ते नाशिक ३० ते ३५ किलोमीटर आहे. यामुळे शेतकऱ्यावर वेळ, पैसा व श्रम यांचा मोठा बोजा पडतो. नाशिक बाजार समितीचे विभाजन होऊन स्वतंत्र बाजार समिती स्थापन झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
समितीच्या अध्यक्षस्थानी संदिप जाधव (उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका), सदस्यपदी दिपक पराये, (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ईगतपुरी) व वैभव मोरडे (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, दिंडोरी) यांचा समावेश आहे.