Combing operation and seizures-कोम्बिंग ऑपरेशन; १४ जण ताब्यात, तलवारी, कोयता, २४ दुचाकी व रिक्षासह १४ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त

कोम्बिंग ऑपरेशन; १४ जण ताब्यात, तलवारी, कोयता, २४ दुचाकी व रिक्षासह १४ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त
मालेगाव : पोलिसांनी राबवलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अटक करण्यात आलेले संशयित. जप्त केलेले कोयते, दुचाकी व ऑटोरिक्षासह पोलिस पथक.
मालेगाव : पोलिसांनी राबवलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अटक करण्यात आलेले संशयित. जप्त केलेले कोयते, दुचाकी व ऑटोरिक्षासह पोलिस पथक.
Published on
Updated on

मालेगाव : शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्यासाठी मालेगाव पोलिसांनी शुक्रवारी पहाटे मोठी कारवाई केली. पवारवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ११ हजार कॉलनी व मालदा शिवार परिसरात पहाटे तीन ते सकाळी सातपर्यंत राबवण्यात आलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये १४ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी ११ तलवारी, एक कोयता, २४ दुचाकी व एक ऑटोरिक्षा असा एकूण १४ लाख ८४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या निर्देशानुसार, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धार्थ बारवाल यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पवारवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या घरांची झडती घेत पोलिसांनी विशेष शोधमोहीम राबविली.

या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मालेगाव शहरातील आठ पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक व कर्मचारी, मालेगाव-मनमाड आरसीपी पथक, वाहतूक शाखा, डीएसबी आणि डीबी पथक सहभागी झाले होते. सुमारे ३० पुरुष पोलिस अंमलदार व ३० महिला पोलिस अंमलदारांसह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारवाईदरम्यान पोलिसांच्या हाती मोठ्या प्रमाणावर धारदार शस्त्रे लागल्याने परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. जप्त करण्यात आलेल्या २४ दुचाकी व ऑटोरिक्षाबाबतही पोलिसांकडून तपास सुरू असून, या वाहनांचा गुन्ह्यांमध्ये वापर झाला आहे का, तसेच त्यांची मालकी व कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या १४ जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारवाया सुरूच राहणार

शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवणे, समाजविघातक घटकांविरुद्ध कठोर कारवाई करणे तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, हा या विशेष मोहिमेचा उद्देश असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील संवेदनशील व गुन्हेगारीच्या दृष्टीने महत्त्वाच्या परिसरांमध्ये यापुढेही अशा प्रकारच्या कोम्बिंग ऑपरेशनसह नियमित तपासणी व कारवाया सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले.

२२ दुचाकींसह तिघे अटकेत; ७लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा मालेगाव पोलिसांनी गुन्हेगारांविरोधातील कारवाईची मोहीम सुरूच ठेवत छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीचोरीच्या प्रकरणाचा छडा लावला आहे. दाभाडी रोड परिसरात केलेल्या कारवाईत पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांच्या तब्बल २२ दुचाकी जप्त केल्या आहेत. या वाहनांची एकूण किंमत सुमारे ७ लाख ७० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै २०२६ रोजी दाभाडी शिवारातील गोंडल हॉटेलसमोरून एमएच ४१ एच ७४६ क्रमांकाची स्प्लेंडर दुचाकी चोरीस गेली होती.

त्यानंतर १४ जुलै रोजी मालेगाव संयोग निकम (२२, रा. दाभाडी) आणि विशाल दगडू भामरे (२४, रा. पिंपळकोठे) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत संशयितांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान आरोपींकडून विविध मॉडेलच्या २२ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, त्यांची अंदाजे किंमत ७ लाख ७० हजार रुपये आहे. या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या आणखी काही घटनांचा उलगडा होण्याची शक्यता असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मालेगाव पोलिसांनी गुरुवारी रात्री ३ ते सकाळी ७ या वेळेत केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ११ हजार कॉलनी परिसरातून १४ संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर छावणी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे पोलिस प्रशासनाचा 'अॅक्शन मोड' कायम असल्याचे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news