

लासलगाव : राकेश बोरा निफाड तालुक्यातील खडक माळेगाव धरण परिसरात दुर्मीळ व आकर्षक असणारा रंगीत करकोचा आढळल्यामुळे पक्षिप्रेमी आणि छायाचित्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पक्ष्याच्या आगमनामुळे धरण परिसरातील जैवविविधता आणि जलसंपत्तीचे पर्यावरणीय महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. मंगळवारी (दि. १६) लासलगाव स्विमिंग ग्रुपचे सदस्य राजू राणा, डॉ. अनिल बोराडे, सुनील ठोंबरे, प्रकाश गांगुर्डे, अजय अग्रवाल, सागर थोरात, सुनील ठोंबरे पोहण्यासाठी गेले असता, त्यांना काठावर तीन - चार रंगीत करकोचे आढळले.
रंगीत करकोचा हा भारतातील सर्वात देखणा जलपक्ष्यांपैकी मानला जातो. त्याची उंची ९५ ते १०० सेंटीमीटर असून, लांब पिवळसर व खाली वाकलेली चोच, लांब गुलाबी पाय आणि पांढऱ्या शरीरावर काळ्या पांढऱ्या पट्ट्यांसह पंखाच्या मागील भागावर उठून दिसणारा गुलाबी रंग ही त्याची खास ओळख आहे.
उन्हात हा गुलाबी रंग अधिक खुलून दिसत असल्यामुळे हा पक्षी सहज लक्ष वेधून घेतो. हा पक्षी प्रामुख्याने तलाव, धरणे, दलदलीचे प्रदेश, उथळ पाणथळ जागा आणि नदीकाठच्या जलाशयांत वास्तव्य करतो. पाण्यातील लहान मासे, बेडूक, खेकडे, गोगलगायी तसेच इतर जलचरांवर तो आपला उदरनिर्वाह करतो. पाण्यात चोच हलवित भक्ष्य शोधण्याची त्याची अनोखी पद्धत पाहण्यासारखी असते.
रंगीत करकोचा हा सहसा समूहाने वावरणारा पक्षी असून, उंच झाडांवर वसाहती करून घरटी बांधतो. त्यांचा प्रजनन हंगाम पावसाळ्यात असतो. जलस्रोतांचे संवर्धन आणि दलदलीचे नैसर्गिक अधिवास टिकून राहिल्यास अशा दुर्मीळ पक्ष्यांची संख्या वाढण्यास मदत होते, असे पक्षी अभ्यासकांचे मत आहे.
संवर्धनानंतर होणार दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन
खडक माळेगाव धरण परिसरात रंगीत करकोचाचे दर्शन झाल्यामुळे हा परिसर पक्षी निरीक्षणासाठी अधिक समृद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्यावरणप्रेमींच्या मते, या परिसरातील जलस्रोत आणि नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन केल्यास भविष्यात आणखी स्थलांतरित व दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन घडू शकते.