

नाशिक : राज्यातील सर्वाधिक थंड शहर म्हणून दरवर्षी पुढे येणाऱ्या नाशिकमध्ये यंदाही थंडीचा कहर बघावयास मिळत आहे. उत्तरेकडील शीतलहरींमुळे जिल्ह्याच्या पाऱ्यात सातत्याने घसरण होत असल्याने, नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. रात्रीच नव्हे तर दिवसाही वातावरणात गारवा राहत असल्याने, दिवसभर उबदार कपडे परिधान करावे लागत आहेत. रविवारी (दि. १) शहरात पारा ११.५, तर निफाडमध्ये १०.५ अंश सेल्सिअस इतका नोंदविला गेला.
सध्या राज्यभर थंडीची लाट पसरली असून, राज्यात सर्वाधिक थंड शहरांमध्ये नाशिकचा समावेश आहे. शनिवारी (दि. ३०) जिल्ह्यातील ओझरमध्ये ६.६ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. तर निफाडचा पारा ७ अंशांपर्यंत घसरला होता. रविवारी (दि. १) पारा काही प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. रविवारी शहरात ११.५, तर निफाडमध्ये १०.५ अंश सेल्सिअस तापसमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील काही दिवसांमध्ये थंडीचा कहर आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याचाही अंदाज वर्तविला जात आहे.
दरम्यान, कडाक्याच्या थंडीमुळे नाशिककरांना दिवसभर उबदार कपडे परिधान करून वावरावे लागत आहे. गेल्या वर्षी नाशिक राज्यात सर्वाधिक थंड शहर म्हणून पुढे आले होते.