

नाशिक : राज्यातील काही भागात थंडीची लाट आली असून पुढील दोन दिवस ही लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. नाशिकचे मंगळवारचे (दि. 9) किमान तापमान 9.3 तर निफाडचे तापमान 5.9 अंश सेल्सियस नोंदविले गेल्याने नाशिककरांना दिवसाही हुडहुडी भरली.
राज्यसह नाशिक शहर व जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. सोमवारी (दि. 8) नाशिकचे किमान तापमान 10.3 तर, मंगळवारी त्यात एक अंश सेल्सियसने घसरण झाली. त्यामुळे नाशिककर कडाक्याच्या थंडीचा अनुभव येत आहे. थंड वारे वाहत असल्याने दिवसाही नाशिककर गारठले आहेत. बंगालच्या उपसागरात 'सेन-यार' आणि 'दिट-वाह' ही दोन चक्रिवादळे तयार झाल्यानंतरही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा जास्त थंडीचा अनुभव आला. आता मात्र, पुढील ११ दिवस (२० डिसेंबरपर्यंत) मार्गशीर्ष दर्श अमावास्यापर्यंत राज्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत रात्री थंडीची लाट तर दिवसा गारठा राहण्याची शक्यता आहे. मुंबई-कोकण विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात हूडहूडी भरण्याचे दिवस येत आहेत. पुढील ११ दिवसांचा अंदाज उत्तर महाराष्ट्रात रात्रीचे तापमान ६ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. तर दिवसाचे कमाल तापमान २४-२७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
थंडी वाढण्याची प्रमुख कारणे
उत्तर भारतातून येणारे वारे ईशान्येकडे वळून महाराष्ट्रात थेट प्रवेश करत आहेत. दक्षिणेकडील हंगामी मान्सूनचा प्रभाव कमी झाल्याने थंड हवेच्या प्रवाहाला अडथळा नाही. उत्तर भारतातून सतत थंड वारे दाखल होत आहेत. जेट स्ट्रीमचा पट्टा ३९ अंश सेल्सीअस उत्तर ते २२ अंश सेल्सीअस उत्तर अक्षवृत्तापर्यंत दक्षिणेकडे रुंदावला आहे.