नाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सोमवारी (दि. २५) शिथिल करण्यात आली. तब्बल ४५ दिवसांच्या आचारसंहितेनंतर पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी आणि नाशिक महापालिकेसह इतर शासकीय कार्यालये जनतेच्या गर्दीने गजबजली.
महाराष्ट्रात १५ वी विधानसभा अस्तित्वात आली असून, लवकरच नवे सरकार राज्याची सूत्रे हाती घेईल. नवीन मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाबद्दल अवघ्या जनतेला उत्सुकता आहे. तशीच उत्कंठा आदर्श आचारसंहिता कधी शिथिल होणार याबाबतही होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी (दि. २५) पत्र काढत राज्यातील आचारसंहिता शिथिल केल्याची घोषणा केली. हे आदेश मिळताच शासकीय कार्यालयांमध्ये लगबग दिसून आली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर राेजी राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणुका घोषित केल्या होत्या. त्याच क्षणापासून आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने शासकीय कार्यालयांचे कामकाज थंडावले होते. त्यामुळे जिल्ह्याच्या मुख्यालयासह जिल्हा परिषद, नाशिक आणि मालेगाव महापालिका तसेच अन्य शासकीय कार्यालयांमधील गर्दी राेडावली होती. आचारसंहितेत कामे ठप्प असल्याने सामान्य जनताही कार्यालयांकडे फिरकत नव्हती. त्यामुळे कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांचा राबता नजरेस पडत होता. मात्र, ४५ दिवसांपासून लागू असलेली आचारसंहिता शिथिल करण्यात आल्याने पहिल्याच दिवशी जनता त्यांची विविध कामे घेऊन कार्यालयांमध्ये हजर झाली. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच लबगब सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.
आदर्श आचारसंहितेमुळे मागील ४५ दिवसांपासून जिल्ह्यातील विकासकामे थंडावली होती, तर प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांच्या निविदाप्रक्रिया आचारसंहितेच्या कात्रीत अडकल्या होत्या. आता आचारसंहिता शिथिल झाल्याने कार्यालयांमधील विकासकामांच्या फायलींवरील धूळ झटकली जाणार आहे, तर दुसरीकडे पावणेदाेन महिन्यांपासून निविदाप्रक्रियेत अडकून पडलेल्या कामांना गती मिळणार आहे.
विधानसभेची आचारसंहिता लागू असली, तरी निरनिराळ्या शासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी हे निवडणुकांच्या कर्तव्यावर नियुक्त होते. शनिवारी (दि. २३) मतमोजणी पार पडल्यानंतर सोमवारी (दि. २५) सकाळी ठरलेल्या वेळेप्रमाणे अधिकारी व कर्मचारी हे त्यांच्या कार्यालयांमध्ये हजर होते. मात्र, कर्मचाऱ्यांमध्ये निवडणुकीचा फीव्हर कायम असल्याचे दिसून आले.