CM's Secretariat Room : मुख्यमंत्री सचिवालय कक्षात तक्रारींचा पाऊस
नाशिकरोड : प्रफुल्ल पवार
नाशिक विभागाच्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षात तक्रारींच्या प्रमारात गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्क्यांनी वाढ झाली असून ऑगस्ट २०२४ पर्यंत १७५ तर ऑगस्ट २५ अखेर २५९ तक्रारींची नोंद झाली आहे. तर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत.
विभागात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वाधिक तक्रारी आहेत तर विभागात आयुक्त धर्मदाय संस्था नाशिक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ धुळे, मुख्याभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक, कार्यकारी अभियंता जल जीवन प्राधिकरण अहमदनगर या विभागातील एकही तक्रार प्राप्त नसल्याचे दिसत आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी तक्रारदार यांना मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत तक्रारी दाखल करण्यासाठी पोहोचणे शक्य नसल्याने थेट मुख्यमंत्र्यापर्यंत संपर्क असलेल्या कार्यालयात तक्रारी दाखल होत आहे.
तक्रारदार जिल्हास्तरावर किंवा विभागीय स्तरावर न्याय मिळाला नाही. तर यांना संबंधित मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी दाखल करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सप्टेंबर 2022 मुख्यमंत्री सचिवालय कक्ष 6 विभागात सुरू करण्यात आले. नागरिकांनी या कक्षात तक्रारी दाखल केल्यानंतर त्याचा निपटारा करण्याबाबत व त्याबाबतचा अहवाल मुंबई येथील मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवणे सक्तीचे असल्याने अनेक अर्जांवर वेळेच्या आत दखल घेऊन त्यांचा निपटारा केला जात असल्याने जिल्हाधिकारी नाशिक यांच्या सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या असल्याचे दिसून येत आहे.
विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार ,जळगाव, अहिल्यानगर या जिल्हास्तरावर झालेल्या तक्रारींच्या घोषवाऱ्यानुसार सर्वाधिक तक्रारी जिल्हाधिकारी नाशिक असून पाठोपाठ शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग यांच्याविरुद्ध आहे.
गत तीन वर्षातील तक्रारी अशा...
जिल्हाधिकारी नाशिक- १०६
शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग- २७
पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण- २१
मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नाशिक- २९
आयुक्त महानगरपालिका नाशिक- २४
जिल्हाधिकारी जळगाव- २२
जिल्हाधिकारी अहिल्यानगर- १९
सहयुक्त नगरपालिका प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक रोड- 1६
जिल्हाधिकारी धुळे- १६
मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. अहिल्यानगर- १७
एकूण विविध 66 कार्यालयांच्या एकूण 456 तक्रारी प्रलंबित आहेत.

