

नाशिक : प्रफुल्ल पवार
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी हा गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण ठरला असून, १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान तब्बल २१.३२५ रुग्णांना सुमारे १८५ कोटी रुपयांची मदत करण्यात आली. नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत 4,196 रुग्णांना 22 कोटी 40 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आलेले आहे.
शासनाने क्राउडफंडिंग आणि त्रिपक्षीय करारावर आधारित अभिनव आरोग्य सहाय्य योजना सुरू केली. योजना अधिक प्रभावी करण्यासाठी निधी कक्षाला एफसीआरए प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. या निधीसाठी परदेशातून थेट देणग्या स्वीकारण्याची सुविधा सुरू केली आहे.
राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना महागड्या उपचारांचा लाभ देता यावा, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या वतीने त्रिपक्षीय करार प्रणाली लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे. या करारात मुख्यमंत्री सहायता निधी, मदत करणारी संस्था/काॅर्पोरेट कंपनी, रुग्णालय/रुग्ण या तीन घटकांचा सहभाग असणार आहे. करारानुसार, उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाचा काही भाग कक्षाकडून, काही भाग मदत करणाऱ्या संस्थेकडून तर उर्वरित भाग संबंधित रुग्णालयाकडून सवलतीच्या स्वरूपात उभारला जाणार आहे
राज्यात प्रथमच मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून क्राउड फंडिंग सुरू होत आहे. ज्या रुग्णांच्या उपचाराचा खर्च १० लाख रुपयांपेक्षा अधिक असेल, ते रुग्ण या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले असून, ते तीन महिन्यांत कार्यरत होणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी https://cmrf.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ तयार करण्यात आलेले आहे.
अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ४ हजारापेक्षा अधिक रुग्णांना 22 कोटींपेक्षा अधिक मदत देण्यात आली आहे. भविष्यात अधिकाधिक रुग्णांपर्यंत मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील.
रामेश्वर नाईक, कक्षप्रमुख, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष