देवळाली कॅम्प : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.24) झालेल्या शिखर समिती बैठकीत भगूर येथील स्वा. विनायक दामोदर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्या थीमपार्क स्मारकासाठी सुमारे चाळीस कोटींच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. यात पहिल्या टप्प्यात 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून स्वा. सावरकर यांचे स्मारक भगूर येथे व्हावे, अशी मागणी सावरकरप्रेमींकडून केली जात होती. यासाठी आमदार सरोज आहिरे (MLA Saroj Ahire) यांनी पाठपुरावा केला होता. मंगळवारी (दि.1 ऑक्टोबर) याबाबत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस थीमपार्कबाबत चर्चेअंती मंजुरी देण्यात आली. स्मारकात स्वा. सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांचा जीवनपट साकारला जाणार आहे. सावरकर यांच्या निवासस्थानाजवळच दोन हेक्टरवर हे थीमपार्क साकारण्यात येणार आहे. यामुळे देश-विदेशातील सावरकरप्रेमींसह पर्यटनाच्या दृष्टीने भगूरचे महत्त्व वाढणार आहे.
स्वा. सावरकर प्रत्येकासाठी स्फूर्तिस्थान आहेत. त्यांच्या स्मारकासाठी (Memorial for Veer Savarkar) पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत बैठक असो की, अधिवेशन काळातील मागणी अशा विविध पातळ्यांवर पाठपुरावा सुरूच होता. अखेर शासनाने चाळीस कोटींच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
आमदार सरोज आहिरे, देवळाली मतदारसंघ, नाशिक.
स्मारकात स्वा. सावरकर यांचा जीवनपट उलगडला जाणार आहे. यात प्रामुख्याने त्यांच्या संघर्षाचे कथाकथन, ऑडिओ- व्हिज्युअल्स, स्वातंत्र्यलढ्यातील शपथेपासूनचा संपूर्ण जीवनप्रवास, लेखन, क्रांतिकारकांच्या भेटी, पन्नास वर्षांची शिक्षा, अंदमान तुरुंगातील वास्तव्य आदी बाबी संग्रहालयाच्या माध्यमातून सादर केल्या जाणार आहेत.