Clean Air Survey- 2024 : स्वच्छ वायू सर्वेक्षणात नाशिकची घसरण

देशात २३ वा क्रमांक; गतवर्षीच्या तुलनेत दोन अंकांची घसरण
National Clean Air Programme (NCAP)
National Clean Air Programme (NCAP)file photo
Published on
Updated on

नाशिक : राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत केंद्राच्या पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने केलेल्या 'स्वच्छ वायू सर्वेक्षण- २०२४"'चा निकाल जाहीर झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत नाशिक शहराची कामगिरी दोन अंकांनी घसरली आहे. 'स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक'ची बिरुदावली मिरवणाऱ्या नाशिकला 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या, देशातील ४७ शहरांच्या स्पर्धेत २३व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत गुजरात राज्यातील सूरत अव्वलस्थानी आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर द्वितीय, तर उत्तर प्रदेशातील आग्रा शहर तृतीय स्थानावर आहे.

वायू प्रदूषणापासून मुक्तीसाठी केंद्र सरकारने 'नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम' अर्थात एन-कॅप अभियान हाती घेतले आहे. याअंतर्गत देशभरातील प्रमुख शहरांमधील हवा स्वच्छ व्हावी याकरिता उपाययोजना राबविण्यासाठी केंद्राकडून निधी अनुदान स्वरूपात दिला जातो. हवा प्रदूषण रोखणे व त्या माध्यमातून २०२४ अखेरपर्यंत देशभरातील १३२ शहरांमधील प्रदूषण पातळी ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे नियोजन आहे. या योजनेंतर्गत नाशिक शहराची निवड करण्यात आली असून, वायू प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने नाशिक महापालिकेला ८७ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. या अनुदानातून हाती घेतलेल्या योजनांची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात महापालिकेला अद्याप यश मिळाले नसल्यामुळे नाशिकची क्रमवारी घसरली आहे. गतवर्षी नाशिक २१ व्या स्थानावर होते. यंदा स्वच्छ वायू असलेल्या शहरांच्या स्पर्धेत नाशिकला २३व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

National Clean Air Programme (NCAP)
Clean Air Better Health | ठाण्यासाठी ‘हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा’ कार्यान्वित

नाशिकला १६५.५ गुण

घनकचरा व्यवस्थापन, टाकाऊ बांधकाम साहित्याची विल्हेवाट, रस्त्यावर उडणारी धूळ, हरित क्षेत्र, एन-कॅप योजनेअंतर्गत हाती घेतलेल्या योजनांची अंमलबजावणी आदी निकषांवर स्पर्धेतील गुणक्रम निश्चित केला गेला. त्यासाठी 200 गुण निश्चित केले होते. या स्पर्धेत नाशिक महापालिकेला १६५.५ गुण मिळाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाच गुण अधिक मिळाले असले, तरी अन्य शहरांना मिळालेल्या अधिक गुणांमुळे क्रमवारी मात्र घसरली आहे.

दिल्ली ११व्या स्थानावर

गतवर्षी १४व्या स्थानी असलेल्या सूरतने यंदा गरुडझेप घेत स्वच्छ वायू सर्वेक्षणात देशात पहिला क्रमांक पटकावला. १२व्या स्थानावरील जबलपूर दुसऱ्या, तर दुसऱ्या स्थानावरील आग्रा शहर तिसऱ्या स्थानी गेले आहे. देशात सर्वाधिक वायू प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचा पहिला क्रमांक लागतो. मात्र स्वच्छ वायू सर्वेक्षणात दिल्लीने ११ वे स्थान पटकावले आहे. वायू प्रदूषणमुक्तीसाठी केलेल्या उपाययोजनांमुळे दिल्लीने हे स्थान मिळविले आहे.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्राकडून शहरांचे मानांकन ठरवले जाते. या स्पर्धेत नाशिक २३व्या स्थानावर आहे. आगामी वर्षात नाशिकची कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.

अजित निकत, उपायुक्त, पर्यावरण विभाग, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news