नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात अर्भकांच्या कक्षाजवळील (एसएनसीयू) चेजिंग रूममध्ये गुरूवारी (दि.3) दुपारी शॉर्ट सर्किट झाले. यामुळे कक्षात गोंधळ उडाला. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सुरक्षेच्या कारणास्तव येथील बाळांना अन्य कक्षात हलविण्यात आले.
जिल्हा रुग्णालयातील स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट मध्ये मुदत पूर्व प्रसूती झालेल्या बाळांना काचेच्या पेटीत, वॉर्मर मध्ये ठेवण्यात येते. गुरूवारी (दि.3) दुपारी दोनच्या सुमारास नवजात अर्भकांच्या कक्षाजवळ शॉर्ट सर्किटमूळे विजेच्या ठिणग्या उडत असल्याचे उपस्थितांनी पाहिले. या कक्षाजवळच चेंजिंग रूम असून तेथून धूर येत असल्याने लक्षात आले. कर्मचाऱ्यांसह बाळांचे आणि अन्य रुग्णांचे नातलग भयभीत झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तेथे काही वेळ गोंधळ उडाला. रुग्णालय प्रशासनाने महवितरणला कळविल्यानतर त्यांचे अधिकारी, कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शॉर्ट सर्किटचे कारण शोधण्याकरीता तपासणी सुरू केली. त्यामूळे प्रशासनाने एसएनसीयूमधील बालकांना सुरक्षित ठिकाणी युनिट सह इतर कक्षात स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. या बाळांना तिसऱ्या मजल्यावरील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले.
चेजिंग रूम मधील स्विच बोर्ड जवळ शॉर्ट सर्किट झाले. आग वैगरे लागलेली नाही. महावितरणचे कर्मचारी तपासणी करण्यासाठी आले आहेत. खबरदारी म्हणून एसएनसीयू कक्ष रिकामा करून दिला असून बालकांना अन्य कक्षात हलविले आहे.
डॉ. चारूदत्त शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने रुग्णालयातील कर्मचारी प्रशांत नाठे याने अग्निशामक यंत्राने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग लागल्याची चर्चा पसरल्याने नातलगांमध्ये घबराट उडाली. मात्र सुरक्षारक्षकांनी तात्काळ गर्दीवर नियंत्रण मिळवले. परिचारिकांनी एसएनसीयू वॉर्डमधील सुमारे ६९ अर्भकांना मातांच्या मदतीने तिसर्या मजल्यावरील कक्षात हलवले. सुदैवाने एकाही अर्भकाला इजा झाली नाही. यावेळी कक्षाजवळ नातलग व रुग्णांमध्ये घबराट पसरली होती. मात्र प्रशासनाने त्यांना दिलासा देत परिस्थिती नियंत्रणात आणली.