

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
श्रावण मास आणि सलग आलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (सिटीलिंक) ने राबविलेल्या जादा बससेवेचा तीन दिवसांत तब्बल ४७ हजार ९९६ भाविकांनी लाभ घेतला. दि. १५ ते १७ ऑगस्टदरम्यान सिटीलिंकच्या बसने प्रवास करून हजारो भाविकांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले.
दि. १५ ऑगस्ट रोजी १५ हजार ५८७, दि. १६ ऑगस्ट रोजी १६ हजार ३२७, तर दि. १७ ऑगस्ट रोजी १६ हजार ८२ प्रवाशांनी त्र्यंबकेश्वर मार्गावरील सिटीलिंक बससेवेचा लाभ घेतला. सलग तीन दिवस भाविकांची मोठी गर्दी झाल्याने जादा बसफेऱ्यांमुळे भाविकांना दिलासा मिळाला.
श्रावण मासात त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्याने प्रत्येक रविवार आणि सोमवार या दिवशी नियमित बससेवेबरोबरच जादा बससेवेचे नियोजन केले आहे.
श्रावण मासात त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्याने प्रत्येक रविवार आणि सोमवार या दिवशी नियमित बससेवेबरोबरच जादा बससेवेचे नियोजन केले आहे. तपोवन आगारातून पाच आणि नाशिकरोड आगारातून पाच, अशा एकूण दहा अतिरिक्त बसेस त्र्यंबकेश्वर मार्गावर धावणार आहेत.
नियमित व अतिरिक्त बसफेऱ्या मिळून नाशिकरोड आगारातून ५७, तर तपोवन आगारातून १०८ बसफेऱ्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भाविकांना सुरक्षित, नियमित आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी सिटीलिंक प्रशासनाने आवश्यक नियोजन केले आहे. त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांनी सिटीलिंकच्या बससेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाने केले आहे.