

सिडको (नाशिक) : उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसह वकिलांना दिलासा देण्यासाठी नाशिकमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच (खंडपीठ) सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नाशिक बार असोसिएशन आणि स्थानिक वकिलांकडून यासाठी हाचाली गतीमान झाल्या असून यासंदर्भात राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाकडे मागणी केली जाणार आहे. सध्या नाशिकरांसह उत्तर महाराष्ट्रातील पक्षकार आणि वकिलांना मुंबई उच्च न्यायालयात जावे लागते. हा प्रवास वेळखाऊ आणि आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरत असल्याने न्याय मिळवण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची होते.
राज्यात सध्या मराठवाड्यासाठी औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे तर विदर्भासाठी नागपूर येथे सर्किट बेंच आहे तर रविवारी (दि.17) कोल्हापूर येथे सरन्यायधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू झाले आहे. याच धर्तीवर नाशिक विभागासाठी सर्किट बेंच सुरू करण्याची मागणी पुढे आली आहे. नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचे केंद्रस्थान असून, येथून धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांसाठी प्रवास करणे सोयीचे आहे. नाशिकमध्ये सर्किट बेंच सुरू झाल्यास या सर्व जिल्ह्यांतील हजारो पक्षकारांना आणि वकिलांना मोठा फायदा होणार आहे. तसेच उच्च न्यायालयातील खटल्यांचा निपटारा लवकर होण्यास मदत होऊन जलद गतीने न्याय मिळवणे सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नाशिकमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू करण्याचा विषय बार असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला आहे. नाशिक येथे नवीन जिल्हा न्यायालय इमारतीचे उद्घाटन २७ सप्टेंबर रोजी होत आहे. त्यावेळी मुख्यमंत्री, वरिष्ठ न्यायमूर्ती व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी याबाबत मागणी केली जाणार आहे.
ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष, नाशिक बार असोसिएशन
मुंबई येथे उच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ, पैसा खर्च होण्याबरोबरच मानसिक त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे नाशिकला उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू झाले तर नाशिककरांसह उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना सोयीचे होईल.
ॲड. प्रशांत जाधव, सिडको
राज्यात मुंबई, नागपूर, संभाजीनगर आता कोल्हापूरला सर्किट बेंच सुरू झाले आहे. नाशिकला प्रादेशिक विभागासाठी उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू होण्याची गरज आहे.
ॲड. सागर, कडभाने, नाशिक