

सिडको : पुढारी वृत्तसेवा
अंबड औद्योगिक वसाहतीतील काही प्लेटिंग (कोटिंग) तयार करणाऱ्या कारखान्यांतून सोडण्यात येणारे पिवळसर रंगाचे रासायनिक दूषित पाणी प्रभाग २७ मधील मारुती संकुल, दत्तनगर, तुळजा भवानी परिसर तसेच नवनाथ महाराज मंदिर परिसरात पोहोचत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
दूषित पाण्यामुळे परिसरातील हातपंप, नाले आणि विहिरींचे पाणीही प्रदूषित होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाने पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर आगामी महासभेत आवाज उठविणार असून, रासायनिक दूषित पाणी सोडणाऱ्या कारखान्यांसमोर जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रभागाचे नगरसेवक नितीन दातीर यांनी दिला आहे.
नागरिकांच्या अंगावर या पाण्यामुळेट्टे पडले आहेत. रासायनिक पाणी भूगर्भात झिरपल्यामुळे हातपंप व विहिरींचे पाणी वापरणे धोकादायक ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे.
नगरसेवक नितीन दातीर यांनी सांगितले की, या गंभीर प्रश्नाकडे महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. दरम्यान, प्रशासनाने उपाययोजना न केल्यास, रासायनिक पाणी नाल्यात सोडणाऱ्या कारखान्यांसमोर जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा दातीर यांच्यासह शंकर धायाळ, ज्ञानेश्वर आडके, विजू आहेर, संतोष उगले, रंगनाथ धायाळ आणि स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.