

नाशिक : सिडकोतील गणेश चौक येथील महापालिकेच्या शाळा क्र. ६८ च्या जागेवर १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासंदर्भातील आरक्षण बदलाच्या नगररचना विभागाच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. या बदलाबाबत सिडको प्रशासनानेही ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे या जागेवर रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
सिडकोत मोरवाडी येथे महापालिकेचे श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल कार्यरत आहे. परंतु, विभागातील नागरिकांची संख्या विचारात घेता, या रुग्णालयातील सेवा अपुऱ्या पडतात. तसेच या रुग्णालयात दुर्धर आजारांवर कोणतेही उपचार होत नसल्यामुळे नागरिकांसाठी अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याची मागणी पश्चिम मतदारसंघाच्या आ. सीमा हिरे यांनी महापालिकेकडे पत्राद्वारे केली होती. या रुग्णालयाकरिता गणेश चौकातील बंद पडलेल्या शाळा क्रमांक ६८ची जागा त्यांनी सुचविली होती. त्यानंतर नाशिक महापालिकेने सिडको प्रशासनास दि. ७ जानेवारी २०२५ रोजी पत्रान्वये शाळेच्या जागेवर रुग्णालय उभारण्याबाबत अभिप्राय मागितला होता. २०१६ च्या करारनाम्यानुसार शाळा इमारत ही मनपाला बांधीव मालमत्ता (विकसित शाळा इमारत) जसे आहे तसे या तत्त्वावर प्रतिवर्ष १०० रुपये इतक्या नाममात्र भाड्याने ६० वर्षे कालावधीसाठी सिडकोकडून हस्तांतरित करण्यात आलेली आहे. तसेच वापरात बदल करावयाचा झाल्यास त्यास सिडकोची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सिडको प्रशासकांनी दि. १७ मार्च २०२५ रोजी प्रस्तावित बदलास सिडकोची कोणतीही हरकत नसल्याचे पत्राद्वारे मनपाला कळविले आहे.
या शाळा इमारतीतील सात वर्गखोल्या गतिमंद मुलांच्या शाळेकरिता ३० वर्षे मुदतीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. यासाठी शासनाची परवानगीही घेण्यात आली आहे. या जागेवर रुग्णालय उभारण्यासाठी शासनाची मान्यता मिळाल्यानंतर या इमारतीच्या जागेवर १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचा प्रस्तावाही शासनाला सादर केला जाणार आहे.