

नाशिक : मातृदिनानिमित्त नाशिकमध्ये भव्य महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन 'पुढारी' वृत्तपत्र समूहातर्फे करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या विधान परिषदेच्या आमदार व महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम मे महिन्यात पार पडणार आहे. या सोहळ्यात समाजकारण, शिक्षण, आरोग्य, उद्योग, कला अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
महिलांच्या कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या योगदानाची व्यापक दखल घेणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमादरम्यान चित्रा वाघ महिला सक्षमीकरण, सामाजिक सहभाग आणि शासनाच्या विविध महिलाविषयक धोरणांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपक्रमांवर त्या सहभागी मान्यवर महिलांशी संवाद साधणार आहेत. नाशिकच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारा हा सोहळा ठरणार असून, शहराच्या लौकिकात भर घालणारा उपक्रम ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
माहिती आणि सहभागासाठी... नाशिक शहर- महेश अमृतकर, ९८६०७९८९८४, नाशिक ग्रामीण - मधुकर देवरे ९०११०२३९९८.