

नाशिक : मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. २३) नाशिकमधील तपोवनात होत असलेल्या 'मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियाना'च्या कार्यक्रमासाठी ५० हजार महिला जमविण्याचे आदेश शासकीय यंत्रणांना देण्यात आले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे ब्रॅण्डींग केले जाणार असून, 'लाडक्या बहिणीं'ची कार्यक्रमस्थळी ने-आण करण्यासाठी तब्बल २०० बसेस पुरविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने सिटीलिंकला दिले आहेत. यामुळे सिटीलिंकच्या २५० बसेसपैकी केवळ ५० बसेस शहरातील अन्य प्रवासी सेवेसाठी उपलब्ध होऊ शकणार असल्याने शुक्रवारी (दि. २३) चाकरमाने आणि विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. (Branding of Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana is going to be done through the program 'Mukhyamantri Mahila Sakthikaran Abhiyan')
लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित जागा मिळू शकल्या नाहीत. आगामी विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महायुती सरकारकडून युध्दपातळीवर योजना हाती घेतल्या जात आहेत. महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणण्यात आली असून या योजनेचे जोरदार ब्रॅण्डींग सरकारकडून सुरू आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या धर्तीवर सरकारने महिला सशक्तीकरण अभियान सुरू केले आहे. त्यात शासनाच्या योजनांची लाभार्थींना थेट मदत/लाभ तसेच विविध शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार होण्यासाठी राज्यभर महाशिबिराचे आयोजन केले जात आहे. नाशिकमध्ये येत्या शुक्रवारी (दि.२३) हा कार्यक्रम होत आहे. महाशिबिराच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस, वाहतूक, महिला व बालविकास या विभागांवर जबाबदारी देतांनाच, कार्यक्रमासाठी ५० हजार महिला जमविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे शहर तसेच ग्रामीण भागातून महिलांना या कार्यक्रमाच्या ठिकाणी नेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्याकडून शुक्रवारी २०० बसेसची मागणी नोंदवली आहे.
सिटीलिंकच्या माध्यमातून शहरात २५० बसेस चालविल्या जात आहेत. दिवसभरात विविध मार्गांवर सुमारे २६०० बस फेऱ्या होतात. सुमारे एक लाख प्रवासी दररोज या बससेवेचा लाभ घेत आहेत. त्यात चाकरमाने तसेच विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. शुक्रवारी सिटीलिंकच्या २०० बसेस मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी वापरल्या जाणार असल्यामुळे चाकरमाने तसेच विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी सिटीलिंकच्या २०० बसेसची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाईल. उर्वरित ५० बसेसच्या माध्यमातून नागरिकांना सेवा दिली जाईल.
मिलिंद बंड, महाव्यवस्थापक(संचलन), सिटीलिंक. नाशिक.