

नाशिक : प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांना यापुढे सरसकट परवानगी दिली जाणार नाही तसेच आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांची परवानगी रद्द केली जाईल. नियमांचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी स्थानिक पोलिस निरीक्षकांची असेल, या जबाबदारीचे पालन न केल्यास पोलिस निरीक्षकावरदेखील कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली.
मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांतील प्रार्थना स्थळांवरील बेकायदेशीर भोंग्यांविरोधात भाजपच्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडली होती. मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दि. २५ जानेवारी २०२५ रोजी मशिदींसह प्रार्थना स्थळांकडून ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमांचे उल्लंघन होणार नाही, असे आदेश दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही, याकडे आ. फरांदे यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना उत्तर प्रदेश सरकारने ज्याप्रकारे भोंग्यांवर कारवाई केली आहे, त्या धर्तीवर महाराष्ट्रातही भोंग्यांवर कारवाई करणार का, असा सवाल आ. फरांदे यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांवर कारवाईचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थना स्थळावर भोंगे लावण्याआधी परवानगी घेतली पाहिजे. रात्री १० पासून सकाळी ६ पर्यंत भोंगे बंद असले पाहिजेत. सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४४ डेसिबलची आवाज मर्यादा असली पाहिजे. कायद्यानुसार अधिक डेसिबलने भोंगे वाजत असतील, तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत. निश्चित कालावधीकरिताच भोंगे लावता येतील. त्यानंतर पुन्हा भोंगे लावायचे असल्यास संबंधितांनी पुन्हा पोलिसांकडून परवानगी घ्यावी. ज्या ठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होईल, त्यांना पुन्हा परवानगी दिली जाणार नाही. जर पोलिस निरीक्षकांनी याचे तंतोतंत पालन केले नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांनी लक्षवेधीस उत्तर देताना स्पष्ट केले.
प्रचलित कायद्यानुसार कारवाईचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहेत. त्यामुळे नियमांमध्येही काही प्रमाणात बदल करणे अपेक्षित आहे. हे बदल झाल्यास भोंग्यांवर अधिक प्रभावी कारवाई करता येईल. यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून नियमांमध्ये बदल करण्यास सुचविले जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आ. फरांदे यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रार्थना स्थळांवरील भोंग्यावर कारवाई करू पण सकाळी 9 च्या भोंग्याचे करायचे काय, असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. मुख्यमंत्र्यांच्या या गमतीदार प्रतिक्रियेनंतर सभागृहात हास्याचे फवारे उडाले.