

पंचवटी (नाशिक) : सूर्याची उपासना करण्यासाठी उत्तर भारतीय बांधव छठ पूजेसाठी रामकुंडासह गोदाघाटाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जमले होते. कुटुंबात सुख- समृद्धी लाभावी, आरोग्य चांगले रहावे यासाठी सूर्याची पूजा करण्यासाठी जमलेल्या भाविकांच्या गर्दीने सोमवारी (दि.२७) गोदाकाठ फुलून गेला होता. नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या हजारो उतर भारतीयांनी आपली पूजा, अर्चा करून सायंकाळी सूर्य देवाला अर्घ्य दिले.
उत्तर भारतीयांचा हा छठ पूजा उत्सव चार दिवस साजरी केली जाते. वर्षातून दोनदा होणाऱ्या या पूजेत कार्तिक महिन्यातील पूजेला महत्व आहे. त्यात शनिवारी (दि.२५) पहिल्या दिवशी स्नान करून भोजन करून पूजा करण्यात आली. त्याला नहाय- खाय म्हटले जाते.
रविवारी (दि.२६) निर्जल व्रत करण्यात आले. सोमवारी हा सूर्य उपासनेचा महत्वाचा दिवस मानला जात असल्याने रामकुंडासह होळकर पुलापासून ते गाडगे महाराज पुलापर्यंतच्या गोदाघाटाच्या पात्राच्या कडेला सुर्यास्त होण्याच्या दोन तास अगोदर उत्तर भारतीय बांधव गोदाघाटावर जमा झाले होते. या भागातील पूजेसाठी त्यांनी सकाळपासूनच जागा आरक्षित करून ठेवल्या होत्या. उसाचे तोरण बांधून त्याच्या खाली टोपलीत विविध फळे ठेवण्यात आली होती. सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर काहीजण परतीच्या मार्गाला लागले तर काही गोदाकाठी थांबून होते.
सूर्योदयाचे पूजन करुन आज उत्सवाचा समारोप
मंगळवारी (दि.२८) सूर्योदयाला पूजा करून या उत्सवाचा समारोप होईल. गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यंदा छठ पूजेचे रौप्य महोत्सवी साजरे करीत आहे. त्यांनी विविध देव देवतांचे देखावे उभारले होते. या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.