

नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे संघटनात्मक बदल केले असून, पक्षाने मंत्री छगन भुजबळ यांना डावलून नाशिक जिल्ह्याच्या संपर्कमंत्रीपदाची धुरा ही मंत्री माणिकराव कोकाटेंवर सोपविली आहे. मंत्री कोकाटे यांची नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करत, मंत्री भुजबळ यांना धक्का दिल्याचे मानले जात आहे.
महापलिकांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांची तयारी सर्वच पक्षाकडून सुरू झाली असून पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक बदल केले आहेत. त्यातच ज्येष्ठ नेते आणि मंत्री कोकाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे. मंत्री कोकाटे हे नाशिक, धुळे आणि जळगाव या जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.
काय आहे जबाबदारी ?
मंत्री कोकाटे यांची निवड केवळ संपर्क साधण्यापुरती मर्यादित नसून, पक्षाचे संघटन मजबूत करणे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त यश मिळवणे या तीन मुख्य उद्दिष्टांसाठी करण्यात आली आहे. संपर्कमंत्री म्हणून कोकाटे यांना तिन्ही जिल्ह्यांमधील स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे आणि त्यांच्यातील गटबाजी संपुष्टात आणणे, ही महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी बुथ पातळीपर्यंत पक्षाचे संघटन सक्रिय करणे आणि नवीन सदस्यांची नोंदणी करणे. त्यासोबतच निवडणुकीसाठी योग्य आणि प्रभावी उमेदवार निवडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणे तसेच पक्षाच्या प्रचाराची रणनीती आखणे आणि मंत्री असल्याने शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून पक्षाची प्रतिमा सुधारणे या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे असणार आहेत.
भुजबळांना डावलले?
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे स्वतः नाशिकचे आहेत. त्यांचा या भागात मोठा राजकीय प्रभाव आहे. ते पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असतानाही पक्षाने ही धुरा कोकाटे यांच्या खांद्यावर दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. आता आगामी काळात यात कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष किती प्रभावीपणे कामगिरी करतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.