

नाशिक : प्रत्येक माणसामध्ये पोलिस दडलेला असतो. आजकाल काय फोटो काढतात अन् निघून जातात. लोकांना रस्त्यावर कोयत्यांनी मारले जाते. फक्त व्हिडिओ काढले जातात, वाचविण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. पुण्यातील घटना फारच विचित्र आहे. पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणून मान्यता आहे. पण अशा गोष्टी होणार नाहीत, यासाठी दक्षता घेतली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
भुजबळ शुक्रवारी (दि. 28) येवला (जि. नाशिक) दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाध्यांशी संवाद साधला. पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकातील एका नादुरुस्त शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे बलात्कार झाला. हा प्रकार बुधवारी सकाळी उजेडात आला. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यावर भुजबळ यांनी भाष्य केले आहे. भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्राला फार मोठी संस्कृती आहे. अशा घटना होणार नाहीत, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. पोलिसांनी शासन करायला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक माणसाने प्रयत्न केले पाहिजे. काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये बंद पडलेल्या मिलमध्ये जागा मोकळी होती. तेथे अशीच एक घटना घडली. आतासुद्धा तिथे काही बसेस वगैरे बंद अवस्थेत आहे. लाइटची व्यवस्था केली पाहिजे. बंद पडलेल्या बसेस काढल्या पाहिजे. गार्डदेखील ठेवले पाहिजेत. तुमचे गार्ड नसतील तर लोक टायरपासून सगळचं घेऊन जातील. अजिबातच तिथे सिक्युरिटी नसेल तर अशा घटना होतात. आता सुसंस्कृत अशा पुण्यामध्ये अशा घटना घडत आहेत. पोलिस निश्चितपणे कडक कारवाई करतील, असे भुजबळ यांनी सांगत समाजानेदेखील यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
अत्याचाऱ्याला फाशी देणारा शक्ती कायदा महाराष्ट्रात कधी अंमलात आणणार? असा प्रश्न माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले की, सगळे मागणी करतात, काहीतरी अडचणी असतील. नवीन कायद्यामध्ये खरोखर किती अंतर्भाव आहे तो पण पाहावा लागेल. कायदा तर कडक असला पाहिजे. परंतु लोकांनीदेखील अशा गोष्टी सहज घेता कामा नये. वाचले आणि सोडून दिले एवढे नाही. आपल्या समाजामध्ये अशा गोष्टींना थारा देता कामा नये, असे त्यांनी सांगितले.