Chhagan Bhujbal | उपमुख्यमंत्रीपद घेऊन फडणवीसांची अहवेलना
नाशिक : राज्यात १३२ आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणे स्वाभाविक आहे. यावर आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही, असे नमूद करत राज्यात महायुतीला बहुमत मिळवून देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तेव्हा पक्षाने फडणवीस यांना दिल्लीवरून उपमुख्यमंत्रीपदाचा आदेश दिला तेव्हा ती एक प्रकारची अवहेलना सहन करून ते उपमुख्यमंत्री झाले, असे मत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले
महात्मा जोतिराव फुले यांच्या १३४ व्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई नाका येथील फुले स्मारकात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भुजबळ यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. शपथविधी व सत्तास्थापनेला वेळ लागत असल्याचे विरोधकांकडून म्हटले जात आहे.
भुजबळ म्हणाले की, ज्या वेळेस तीन पक्ष एकत्रित येत असतात त्यावेळी सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो. काही वेळेस महिना महिना देखील लागला आहे, त्या मानाने हा वेळ काहीच नाही. येत्या दोन ते चार दिवसांत शपथविधीचा कार्यक्रम उरकला जाईल. भाजपचे 132 आमदार झाले आहेत, त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणार हे स्वाभाविक आहे. एकनाथ शिंदे हे त्यांचा निर्णय घेतील, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले. राज्यात मुख्यमंत्री व इतर मंत्रिपदं देताना जातीय समीकरणाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. यावर भुजबळ म्हणाले की, असे काहीही होणार नाही. १३२ आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणे स्वाभाविक आहे. यावर आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तेव्हा फडणवीस म्हणाले मी बाहेर राहून काम करेल. मात्र पक्षाने त्यांना दिल्लीवरून सांगितले तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हावे लागेल. तेव्हा ती एक प्रकारची अवहेलना सहन करून ते उपमुख्यमंत्री झाले. पूर्णपणे त्यांनी त्यांच्या कामाला झोकवून दिले होते, असे भुजबळ यांनी सांगत अडीच वर्षापूर्वी झालेल्या सत्तास्थापनेच्या प्रक्रियेची आठवण करुन दिली.
जरांगे येवल्यात रात्री २ पर्यंत फिरत होते
इव्हीएम मशीनवर शंका घेणाऱ्या विरोधकांचा भुजबळ यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, हे लोक मशीनवर संशय घेतात. पण २०१९ साली निवडणुकीमध्ये मला ५६ हजारांचा लीड होता. मनोज जरांगे माझ्या मतदारसंघात रात्री 2 वाजे पर्यंत फिरत होते. माझे मतदान २ लाखांपर्यंत जायला पाहिजेल होते जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला, आणि एका मोठ्या वर्गाचे मत मला मिळाले नाहीत. ईव्हीएममद्ये गडबड असती तर मला देखील आणखी एक लाख मतं मिळायला हवी होती, असा टोला भुजबळ यांनी लगावला.

