

नाशिक: मिलिंद सजगुरे
सत्तेमध्ये असो की विरोधात, आपल्या आक्रमक स्वभावामुळे छगन भुजबळ हे सातत्याने चर्चेमध्ये असतात. मुद्दा ओबीसीशी निगडित असो की राजकीय, त्यावर स्पष्ट आणि परखड मत व्यक्त करणे हा भुजबळ यांचा स्थायी स्वभाव आहे. विधानसभा निवडणुकीत बंपर बहुमत मिळालेल्या महायुती मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ यांनी थेट पक्ष नेतृत्वाला दूषणे देत बंडाची भाषा केल्याने ऐन थंडीत राज्यात राजकीय उष्मा निर्माण झाला आहे. आता पक्षनेतृत्व भुजबळांच्या भावनेला प्रतिसाद देतात की ओबीसींची मोट बांधत बाहुबली वेगळा काही निर्णय घेतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
मंत्रिपदावरून वगळल्याची अंदाजित कारणे...
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगेंना टोकाचा विरोध
नाशिक जिल्ह्यातील पक्षीय आमदारांचा एकमुखी विरोध
लोकसभा निवडणुकीत नाशिक, दिंडोरीत महायुती उमेदवारांविरोधी घेतलेली भूमिका
अनेक वर्षे मंत्रिपदावर राहताना विशिष्ट घटकांना झुकते माप दिल्याच्या तक्रारी
महायुती वा स्वपक्षापेक्षा वैयक्तिक मतांना प्राधान्य देणे अंगलट
राज्यात अभूतपूर्व बहुमतासह देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर कोणत्या शिलेदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागते, याबाबत उत्कंठा निर्माण झाली असतानाच महायुतीच्या तीनही पक्षांनी धक्कातंत्राचा वापर करीत अनेक ज्येष्ठांना मंत्रिपदाची झूल नाकारली. त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांचा समावेश आहे. भुजबळ यांना डावलण्याचे कारण पक्ष नेतृत्वाकडून अद्याप स्पष्ट करण्यात आले नसले तरी ज्या मुद्द्यांचा ऊहापोह माध्यम संवादादरम्यान करीत त्यांनी पक्षातील त्रिमूर्तीवर शरसंधान केले ते पाहता वयाने सर्वात ज्येष्ठ असलेल्या या बाहुबलीचे इंजिन साईडलाईन्ड करण्याचा हा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषत:, भुजबळ यांनी उद्धृत केलेला जरांगे विरोधाचा मुद्दा त्यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याचे सबळ कारण असल्याचे म्हणता येईल. पक्षाची धोरणे आणि निर्णयप्रक्रिया अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी हायजॅक केल्याची भुजबळ यांची टीका बरेच काही सांगून जाते.
मंत्रिपद नाकारलेल्या भुजबळ यांनी हिवाळी अधिवेशन अर्धवट सोडून नाशिकची वाट धरली. समता परिषद सैनिकांना एकवटवून त्यांनी पक्ष नेतृत्वावर दबाव आणण्याची खेळी खेळली आहे. राज्यातील ओबीसींमध्ये आजही आपल्या नेतृत्वाची जादू असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत निर्णायक भूमिका घेता येईल, असा गर्भित इशारा भुजबळ यांनी नाशिकच्या मेळाव्यात दिला. मैं वो पुराना सिक्का हूं, मुझे फेक न देना; हो जाए, तुम्हारे बुरे वक्त में मैं कही काम आ जाऊं.. ही भुजबळ यांची शायरी पक्षनेतृत्वाला सरळसरळ आव्हान असल्याचे मानले जात आहे. भुजबळ यांनी तूर्तास एकट्याने पक्षातील बंडाचा पूर्वार्ध गाठला असला तरी उत्तरार्धात इतर काही सवंगड्यांनिशी ते वेगळा निर्णय घेऊ शकतात, याची प्रचिती त्यांच्या सातत्यपूर्ण विधानांतून अधोरेखित होत आहे. आपले उपद्रवमूल्य पक्षाला परवडणार नसल्याचेही ते खासगी आणि सार्वजनिक चर्चांमधून आवर्जून सांगत आहेत. याच अनुषंगाने, आगामी काळात राज्याच्या राजकारणातील हा बाहुबली कोणत्या निर्णायक भूमिकेत येतो, याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.