

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सुनेत्रा पवार यांनी राज्यात उपमुख्यमंत्री होण्यासाठी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दावा केल्याचे समजते. पवार यांच्या जागेवर महायुतीकडून आणि विशेषतः राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळणार, याविषयी राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढविले जात होते.
मंत्री भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा बोलून दाखविली होती, पक्षाने आदेश दिल्यास नक्कीच विचार करेन. मात्र, मी स्वतःहून राज्यसभेची मागणी कशी करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
राज्यसभेची निवडणूक जवळ येऊ लागली, तशा घडामोडींना वेग आला आहे. या जागेसाठी पडद्यामागून भुजबळ लॉबिंग सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भुजबळ हे केवळ स्वतः साठीच नव्हे, तर कुटुंबातील इतर सदस्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठीही आग्रही असल्याचे दिसत आहेत.
पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठीही भुजबळांनी वरिष्ठ पातळीवर जोरदार मागणी लावून धरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भुजबळ हे राज्यसभेवर आणि पुतण्याला मंत्रिमंडळात घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आणि विरोधकांकडून राजकीय घराणेशाहीचा आरोप केला जाऊ शकतो.
मात्र, राज्यात अजित पवार उपमुख्यमंत्री असताना, सुनेत्रा पवार यांना खासदार करण्यात आले. सुनील तटकरे खासदार असताना, मुलीला राज्यात कॅबिनेट मंत्री केले. आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा राज्यात उपमुख्यमंत्री, त्यांचा मुलगा पार्थ पवार दिल्लीत खासदार, मग इतरांबाबत हे सूत्र लागू का केले जात नाही, असा प्रश्न भुजबळ समर्थकांनी उपस्थित केला आहे.