

नाशिक : महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावलल्यात आल्याने नाराज असलेले ओबीसी नेते तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे विदेश दौऱ्यावरून गुरूवारी (दि.2) परत येत आहेत. सावित्रीबाई फुले जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई नाका स्मारकात आयोजित अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्ताने भुजबळ समर्थकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्यात आल्याचे वृत्त आहे.
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावलण्यात आले. त्यामुळे ते नाराज आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी महायुती सरकारविरोधात रान पेटविल्यानंतर भुजबळ यांनी ओबीसी समाज महायुतीच्या पाठीशी उभा करत पुन्हा बहुमताची सत्ता मिळवून दिली. परंतू भुजबळ यांनाच मंत्रिपद नाकारण्यात आल्याने ओबीसी समाजातही नाराजी पसरली आहे. भुजबळांनी येवल्यानंतर नाशकात राज्यभरातील ओबीसी नेत्यांची बैठक घेत पुढील भूमिकेविषयी मंत जाणून घेतली. अनेकांनी भाजपात प्रवेश करण्याचे तर काहींनी ओबीसींचा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची भुजबळांना गळ घातली. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य तो सन्मान देण्याचे आश्वासन दिल्यानंतर भुजबळांनी संयमीपणाची तसेच काही काळ शांत भुमिका घेतली. ते आठवडाभरापासून परदेश दौऱ्यावर होते. गुरूवारी (दि.2) सायंकाळी ते नाशिकमध्ये परतणार आहेत.
छगन भुजबळ यांचे गुरूवारी दुपारी चार वाजता नाशिकमध्ये आगमन होईल. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीच्या निमित्ताने मुंबई नाका येथील स्मारकात भुजबळ यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भुजबळ यांच्या हस्ते महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला जाणार आहे. यावेळी भुजबळ समर्थकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.