Chhagan Bhujbal | संतप्त भुजबळ समर्थक रस्त्यावर

राष्ट्रवादी भवनसमोर अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा
नाशिक
नाशिक : छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावलल्याने राष्ट्रवादी भवनासमोर घोषणाबाजी करताना समर्थक.(छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावलले गेल्याने संतप्त भुजबळ समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. भुजबळ समर्थकांनी नाशिकमधील राष्ट्रवादी भवनसमोर टायर जाळत पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली. विंचूर येथे रास्तो रोको, तर येवला येथील भुजबळांच्या कार्यालयाबाहेरही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

मंत्रिमंडळात भुजबळ यांचा सहभाग गृहीत धरून समर्थकांनी जय्यत तयारी केली होती. गतवेळी महायुती सरकारमध्ये उशिरा सहभागी झालेल्या अजित पवार गटाला प्रयत्न करूनही नाशिकचे पालकमंत्रिपद अखेरपर्यंत मिळाले नव्हते. त्यामुळे यंदा सरकार स्थापन होण्यापूर्वीच भुजबळ समर्थकांनी मोर्चेबांधणी केली होती. भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्री व्हावे म्हणून युवक राष्ट्रवादीच्या वतीने महादेवाला दुग्धाभिषेक करून साकडे घालण्यात आले होते. नव्या मंत्रिमंडळात भुजबळ यांचा समावेश नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मात्र सर्व चित्र पालटले. नव्या मंत्रिमंडळात भुजबळ यांना वगळल्याने खुद्द भुजबळ यांच्यासह समर्थकांना जोरदार धक्का बसला आहे. भुजबळ यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत ते अधिवेशन सोडून नाशिकला परतले आहेत. संतप्त समर्थकांनी रात्री मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयासमोर टायर पेटवून अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केल्याच्या चित्रफिती समाजमाध्यमांत पसरल्या. त्यानंतर सोमवारी (दि. 16) सकाळीही समर्थक या परिसरात आंदोलनासाठी जमले होते. यावेळी अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या. भुजबळांच्या येवला मतदारसंघातही समर्थक रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. विंचूर येथे रास्ता रोको करून कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाच्या कार्यपद्धतीचा निषेध केला, तर येवला येथील भुजबळ यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

भाजपच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त असून, ते भुजबळांना देण्याची मागणी यावेळी समर्थकांनी केली. भुजबळ यांना मंत्रिमंडळात न्याय द्यावा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास याहून तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे मुंबई नाका परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या आंदोलनात अंबादास खैरे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, पूजा आहेर, डॉ. प्रवीण गुल्ले, संतोष खैरनार, राजेंद्र जगझाप, शिवा काळे, शशी बागूल, दुर्गेश चित्तोड, आशा भंदुरे, चंद्रकांत माळी आदी सहभागी झाले होते.

पदाधिकाऱ्यांशी आज संवाद साधणार

अधिवेशनाहून परतलेले भुजबळ मंगळवारी (दि. १७) सकाळी ९.३० वाजता नाशिक येथील भुजबळ फार्म कार्यालय येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. यावेळी भुजबळ आपल्या समर्थकांना काय संदेश देतात, पुढे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news